बेकिनकेरे येथील ग्रामस्थांना न्याय द्या
जमीन खरेदीत गैरप्रकार : जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
बेळगाव : बेकिनकेरे येथील कुरुंदवाड संस्थानमधील सर्व्हे क्र. 16 मधील जमीन खरेदीत गैरप्रकार झाला आहे. कित्येक वर्षापासून गावच्या ताब्यात असलेल्या जमिनीतील गैरप्रकार थांबवून गावकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. येथील अंगणवाडी केंद्र (क्रमांक 96) हटविण्यासाठी न्यायालयाकडून आदेश बजावण्यात आला आहे. मात्र या ठिकाणी आरोग्य केंद्र, प्राथमिक कन्नड शाळा, ज्ञानेश्वर व नागनाथ मंदिर, तलाव, सार्वजनिक शौचालये आहेत.
शिवाय शासकीय योजनादेखील या ठिकाणी राबविण्यात आल्या आहेत. असे असले तरी हलगेकर यांनी गैरप्रकारे ही जमीन खरेदी केली आहे. शिवाय येथील अंगणवाडी हटविण्यासाठी गावकऱ्यांवर दबाव घातला जात आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी. कुरुंदवाड सरकारपासून गावकऱ्यांच्या ताब्यात असलेली जमीन अचानक खासगी मालकांच्या नावावर चुकीच्या पद्धतीने करण्यात आली आहे. या बेकायदेशीर प्रकरणाची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि गावकऱ्यांना न्याय द्यावा,अशी मागणीही निवेदनात करण्यात आली. यावेळी ग्राम पंचायत सदस्य राजू सावंत, सविता बाळेकुंद्री, शंकर सावंत, विलास यळ्ळूरकर, मारुती सावंत, विठ्ठल तोरे, लक्ष्मण धायगोंडे, विठ्ठल चोपडे, बाळाराम सनदी यासह ग्रामस्थ उपस्थित होते.