कसबा बावड्यातील झोपडपट्टी धारकांना न्याय द्या
- शेतकरी कामगार पक्षाची मागणी : मनपा प्रशासनास निवेदन
►कोल्हापूर, प्रतिनिधी
कसबा बावडा येथील झोपडपट्टी धारकांना त्यांच्या हक्काची पक्की घरे देवून न्याय देण्यात यावा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाकडून करण्यात आली आहे. मागणीचे निवेदन मनपा प्रशासनास देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, शहरातील अधिकृत झोपडपट्ट्यांपैकी कसबा बावडा येथील सरकारी शुगर मिल रोड परिसरातील झोपडपट्टीधारकांना मुंबई उच्चन्यायालयाच्या खंडपीठाचा आदेश, शासनाचे आदेश, शासकीय, प्रशासकीय आदेश 2002 साली संबंधित जिल्हाधिकारी व आयुक्त यांना दिले असून देखील आज तागायत दलित, कष्टकरी, भूमीहीन झोपडपट्टी धारकांना त्यांची हक्काची बांधीव घरे मिळालेली नाहीत. संदर्भात तत्कालीन पालकमंत्री, मंत्री, आयुक्त व जबाबदार शासकीय अधिकाऱ्यांची विस्तृत बैठक होऊन देखील कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही. हि प्रक्रिया इतकी वर्षे का थांबली आहे याचा खुलासा प्रशासनाने करावा व या संदर्भातील त्रुटी दूर करून प्रक्रियेला गती द्यावी अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क करून माहिती घेतली व शिष्टमंडळास वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून तातडीने हा प्रश्न निकालात काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.
निवेदन देतेवेळी बाबुराव कदम, शहाजी सनदे, सुभाष दाभाडे, उमाजी सनदे, संभाजीराव जगदाळे, सचिन जाधव, मधुकर हरेल, आनंद पोवाळकर ,राजाराम धनवडे, चंद्रकांत सूर्यवंशी, अस्लम बागवान, लखन मुल्लाणी, वैशाली सूर्यवंशी, पुष्पा दाभाडे, मंगल सनदे, विद्या सनदे, गीता जाधव, शितल पोवाळकर, प्रिया जाधव आदी उपस्थित होते.