बारा हजार कोटी खर्चाची माहिती जनतेला द्या : युरी
थकीत 1400 कोटींबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी: मेणबत्ती पेटवून विरोधी पक्षनेत्यांची पत्रकार परिषद
पणजी : राज्य सरकारने सामान्यांचे जगणे मुश्कील करून सोडले आहे. आता जनतेवर 3.5 टक्के वीज दरवाढीचा बोजा सरकार टाकत आहे. जर वीज दर वाढ करायचीच असेल, तर त्यापूर्वी 2019 ते 2022 या दरम्यान राज्य सरकारने वीज वितरण आणि पारेषण प्रणाली सुधारण्यासाठी 12 हजार कोटी ऊपये खर्च केले होते. वीजमंत्र्यांनी भूमिगत वीज वाहिनी टाकण्याचे काम होणार असल्याचे सांगितले असले तरी उर्वरित रक्कम कुठे गेली आणि वीज पुरवठ्यात सुधारणा झाली का, याची माहिती सरकारने जनतेला द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली. पर्वरी येथील विधानसभेतील विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत युरी आलेमाव बोलत होते. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, आमदार कार्लुस फेरेरा व अॅल्टन डिकॉस्टा उपस्थित होते.
थकीत 1400 कोटींबाबत काय?
युरी आलेमाव म्हणाले, एका बाजूला वीजदर वाढविले आहेत,तर दुसऱ्या बाजूला बिल भरण्यास विलंब झाला म्हणून जोडण्या तोडल्या जात आहेत. अनेक उद्योजकांची, व्यावसायिकांची बिले थकीत आहेत. तरीही त्यांना त्रास न देता केवळ सामान्य जनतेला दिला जात आहे. 1400 कोटींचा बिलाच्या ऊपाने जो महसूल थकीत आहे, त्यात वीज खातेही थकबाकीदार आहे. त्यामुळे थकीत 1400 कोटींच्या वीज महसुलाबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
सर्व अधिकारी, मंत्र्यांच्या चेंबरमधील वीज तोडा
दोन दिवसांपूर्वी आसाम राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले की, सर्व सरकारी अधिकारी, आमदार, मंत्री स्वत:च्या पैशातून वीज बिल भरतील. आपणास विरोधी पक्षनेता म्हणून सरकारी घर मिळत होते, तरीही ते आपण घेतलेले नाही. तरीही विरोधी पक्षनेत्याच्या चेंबरमधील वीज जोडणी कापली असेल आणि वीज वाचविली असेल तर आपण या निर्णयाचे स्वागत करतो. वीज वाचविण्यासाठी केवळ आपल्या चेंबरमधील वीज तोडली जाऊ नये, तर सर्व अधिकारी, मंत्र्यांच्या चेंबरमधीलही वीज तोडली जावी,अशी आपली मागणी असल्याचे युरी आलेमाव म्हणाले.
युरी आलेमावनी पदाची शान राखावी : तवडकर
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी विरोधी पक्ष नेत्याची गरीमा सांभाळावी आणि ‘चीप पब्लिसिटी’ मिळवण्याचा प्रयत्न करू नये, अशी विनंती वजा इशारा सभापती रमेश तवडकर यांनी दिला आहे. आलेमाव यांनी पर्वरी येथे विधानसभा प्रकल्पातील आपल्या दालनात पत्रकार परिषद मेणबत्ती लावून घेतली. वास्तविक त्यांच्या दालनाच्या दुऊस्तीचे काम चालू आहे. सुमारे 50 टक्के पेक्षा जास्त काम झाले असावे. हे काम चालू असताना तांत्रिकदृष्ट्या वीज प्रवाह बंद केलाही जाऊ शकतो. अशावेळी त्यांनी जर विनंती केली असती तर दुसरे दालन त्यांना मिळवूनही दिले असते.परंतु असे न करता त्यांनी मेणबत्ती लावून पत्रकार परिषद घेणे हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. किमान जे पद आपण सांभाळतो त्या पदाची शान राखणे हे त्यांचे कर्तव्य आहे, याची याद त्यांना आपण करतो, असे सभापती म्हणाले.