‘बरकत’ दे दर्या....! जिल्हाभरात नारळी पौर्णिमा उत्साहात
रत्नागिरी प्रतिनिधी
जिल्ह्यातील मच्छीमार, कोळी बांधवांनी नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. समुद्राला शांत करण्यासाठी विधीवत पूजन करून मानाचे नारळ अर्पण करण्यात आले. दापोली तालुक्यातील हर्णै बंदरात वाजतगाजत मोठ्या उत्साहात मिरवणुका काढण्यात आल्या. रत्नागिरीतील मांडवी किनाऱ्यावर पूजा केल्यानंतर मानाचा नारळ जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्याहस्ते अर्पण करण्यात आला.
श्रावणातील ही पौर्णिमा समुद्र किनाऱ्यालगत राहणाऱ्या लोकांसाठी महत्त्वाची असते. प्रामुख्याने मासेमारी करणाऱ्या कोळी लोकांचा महत्त्वाचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा. पौर्णिमेच्या या पूजेनंतर खवळलेला समुद्र शांत होतो. तसेच पावसाचा जोर ओसऊ लागतो आणि मच्छीमार बांधव मासेमारीला सुऊवात करतात. नारळी पौर्णिमेच्या दिवशी दर्याला सोन्याचा नारळ अर्पण करायचा आणि वर्षभर भरपूर मासळी गावण्यासाठी प्रार्थना करायची. पारंपरिक गोडधोड पदार्थ, पारंपरिक कोळीनृत्ये आणि अनोख्या स्पर्धांचा मोठा माहोल असतो. अशाच पद्धतीने सोमवारी जिल्ह्यात नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. समुद्राला नारळ अर्पण करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
खोल समुद्रात मासेमारीला जाणाऱ्या आमच्या धन्याचे रक्षण कर, आमच्या बोटीवर मुबलक मासोळी गावू दे... असे समुद्राला गाऱ्हाणे घालण्यात आले. मांडवी जेटी येथे रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे तसेच कस्टम विभागातर्फे मानाचे नारळ समुद्राला अर्पण करण्याचा कार्यक्रम पार पडला. रत्नागिरीत मांडवी, मिरकरवाडा, मिऱ्या, भाट्यो, काळबादेवी, गोळप, पूर्णगड, वरवडे आदी ठिकाणी मच्छिमार बांधवांनी समुद्राला नारळ अर्पण करून मासेमारीला खऱ्या अर्थाने प्रारंभ केला आहे. बोटीवरचे गावी गेलेले खलाशीही आता पुन्हा मासेमारी बंदराकडे परतले आहेत.