राष्ट्रीय इडीग समाजाला 500 कोटी अनुदान द्या
विधानसौध परिसरात आंदोलनाद्वारे मागणी
बेळगाव : ब्रह्मश्री नारायण गुरु इडीग विकास महामंडळाला 500 कोटी रुपयांचे अनुदान द्या, इडीग समाजाला एसटीतून आरक्षण द्या, त्याबरोबर विश्वगुरु ब्रह्मश्री नारायणगुरु बेंगळूर येथे उभा करा, राज्य सरकारने समाजातील सदस्याला मंत्रीपद द्यावे आदी मागण्यांसाठी राष्ट्रीय इडीग महामंडळातर्फे गुरुवारी विधानसौध परिसरात आंदोलन छेडण्यात आले. इडीग समाजातर्फे शासनाकडे विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी यापूर्वी निवेदने सादर करण्यात आली आहेत. मात्र सरकारचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. ब्रह्मश्री नारायण गुरु इडीग विकास महामंडळ स्थापन करण्यात आले आहे. मात्र दोन वर्षांपासून महामंडळाला अनुदान मिळालेले नाही. या महामंडळासाठी 500 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. त्याबरोबर समतेचे प्रणेते असलेले विश्वगुरु ब्रह्मश्री नारायणगुरु यांचा पुतळा राजधानी बेंगळूर येथे उभा करावा, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली.