प्रत्येक जि.प.गटातून 50 हजार रुपयांची वर्गणी द्या
कोल्हापूर / कृष्णात चौगले :
जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा कारभार नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्यांच्या दालनासमोरच पैसे मोजणाऱ्या आणि खिशात पैसे ठेवणाऱ्या दोन शिपायांवर केलेली कारवाई, पाण्याच्या टाक्यांची परस्पर विल्हेवाट आणि वर्षानुवर्षे चालत आलेल्या टक्केवारीच्या प्रकारामुळे बांधकाम विभाग नेहमीच चर्चेत राहिला आहे. आता तर जिह्यातील सर्व 67 जि. प. गटातून प्रत्येकी 50 हजार रुपये वर्गणी देण्याचे आदेश ‘बांधकाम’च्या वरीष्ठ अधिकाऱ्याने दिले असल्याची माहिती काही शाखा अभियंत्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितली. ‘बांधकाम’मधील या सर्व ‘अर्थपूर्ण’ घडामोडींचा उहापोह करणारी वृत्तमालिका आजपासून...
जिल्हा परिषद बांधकाम विभागातील अंतर्गत खर्चासाठी सर्व जि.प. गटातून प्रत्येकी 50 हजार रुपयांची वर्गणी द्यावी, असे तोंडी आदेश ‘बांधकाम’च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने जिह्यातील सर्व शाखा अभियंत्यांना दिल्याची माहिती काही शाखा अभियंत्यांनी दिली. ‘बांधकाम’मधील अंतर्गत खर्चासाठी सदरची वर्गणी असून ती तत्काळ जमा करावी, अशा सूचना सर्व शाखा अभियंत्यांना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले. वर्गणी घेण्याचा प्रकार हा चालू वर्षातील नसून दरवर्षी घेतली जाते. पण यंदा रकमेत मोठी वाढ केली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचा नेमका अंतर्गत खर्च किती आहे आणि तो कशासाठी केला जातो हे जाहीर करावे, असे आवाहन काही शाखा अभियंत्यांनी केले आहे.
33 लाख 50 हजारांची वर्गणी होणार जमा
वर्षानुवर्षे वर्गणी घेण्याचा पायंडा सुरु असला तरी दरवर्षीच्या 30 ते 35 हजारांवरून थेट 50 हजार रुपये वर्गणी देण्याचे आदेश शाखा अभियंत्यांना दिले आहेत. त्यामुळे एकूण 33 लाख 50 हजार रुपयेंच्या जमा होणाऱ्या रकमेतून बांधकाम विभागाकडून काय केले जाणार आहे? याची कोणतीही माहिती शाखा अभियंत्यांना दिली जात नाही. केवळ अंतर्गत खर्चाच्या नावाखाली वर्गणीची रक्कम जमा केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
50 ते 60 टक्के वर्गणी जमा
बांधकाममधील अधिकाऱ्याच्या आदेशानुसार जिह्यातून सुमारे 50 ते 60 टक्के वर्गणी जमा झाली आहे. उर्वरित शाखा अभियंत्यांकडून ही वर्गणी देण्यास नकार दिला जात आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याकडून त्या शाखा अभियंत्यांना ‘टार्गेट’ केले जाण्याची शक्यता अभियंत्यांनी वर्तवली.
अंतर्गत खर्च नेमका कशासाठी ?
बांधकाम विभागाच्या अंतर्गत खर्चासाठी प्रत्येक जि. प. गटातून 50 हजार रुपये देण्याचे आदेश बांधकामच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी शाखा अभियंत्यांना दिले आहेत. पण हा अंतर्गत खर्च कोणासाठी केला जातो? कोणत्या अधिकाऱ्याचा हा खर्च आहे? एवढी मोठी रक्कम कोणासाठी आणि कशासाठी खर्च होणार? त्याचा वाटा किती जणांपर्यंत पोहोचवला जाणार? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने शाखा अभियंत्यांनी उपस्थित केले.
वर्गणी मागितली असल्याची माहिती चुकीची
जिह्यातील सर्व जिल्हा परिषद गटातील शाखा अभियंत्यांकडून वर्गणी मागितली असल्याबाबतची माहिती चुकीची आहे. आमच्या विभागातीलच काही मंडळींकडून खोटी माहिती पसरवून विनाकारण बदनामी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची शक्यता आहे. अशा प्रकराची कोणतीही वर्गणी जि. प. बांधकाम विभागाकडून मागितलेली नाही.
-सचिन सांगावकर, कार्यकारी अभियंता, जि. प. बांधकाम विभाग, कोल्हापूर