SSCResult2026 | दहावीच्या निकालात मुलींची पुन्हा बाजी; राज्याचा निकाल ९२.०९ टक्के
महाराष्ट्र SSC निकाल जाहीर; १४ लाखांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण
मुंबई -महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ च्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून यंदाही विद्यार्थिनींची सरशी कायम राहिल्याचे चित्र दिसून आले. राज्यभरातील नऊ विभागांतून १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १४ लाख ५२ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून राज्याचा एकूण निकाल ९२.०९ टक्के लागला आहे.
निकालाच्या आकडेवारीत मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. विद्यार्थिनींचा उत्तीर्णतेचा टक्का ९४.९६ इतका राहिला, तर विद्यार्थ्यांचा निकाल ८९.५६ टक्के नोंदवला गेला. त्यामुळे मुली मुलांपेक्षा ५.४० टक्क्यांनी पुढे असल्याचे स्पष्ट झाले.
पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, लातूर, नागपूर आणि रत्नागिरी या विभागांतील विद्यार्थ्यांनी यंदाची परीक्षा दिली होती. मंडळाने एकूण ६४ विषयांच्या परीक्षा घेतल्या असून त्यापैकी २० विषयांचा निकाल शंभर टक्के लागल्याची माहिती समोर आली आहे.
मार्च-एप्रिल २०२६ मध्ये घेतलेल्या दहावीच्या (SSC) परीक्षेचा निकाल आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून अधिकृतपणे जाहीर केला आहे. बारावीप्रमाणेच दहावीचा राज्याचा निकाल घसरला आहे. गतवर्षीपेक्षा दहावीचा निकाल २ टक्क्यांनी घसरला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालाच्या टक्केवारीत मुलांपेक्षा सरस कामगिरी करत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. कोकणचा निकाल सर्वाधिक लागलाय.
पुणे, मुंबईसह अनेक विभागांचा निकाल समाधानकारक लागला आहे. सर्वात जास्त निकाल कोकण विभागाचा तर सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगर विभागाचा लागला आहे. थोड्याच वेळात विद्यार्थ्यांना https://mahahsscboard.in/ अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. (MSBSHSE result) राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंग आणि राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी बारावीच्या निकालाबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली.