सीईटी निकालात मुलीच अव्वल
निकाल जाहीर ः ‘टॉप टेन’मध्ये मुलांचा दबदबा
प्रतिनिधी/ बेंगळूर
अभियांत्रिकी, कृषी, फार्मसी यासह विविध व्यवसायिक कोर्सच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सीईटीचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला आहे. यावेळी देखील सीईटी विद्यार्थिनींनी एकूण निकालात वरचष्मा राखला आहे. तर विद्यार्थी टॉपर्सच्या यादीत वरचढ ठरले आहेत. बेंगळूरमधील कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाच्या कार्यालयात उच्चशिक्षणमंत्री डॉ. अश्वथ नारायण यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला.
यंदाच्या सीईटीसाठी एकूण 2,10,829 उमेदवार हजर झाले होते. त्यापैकी अभियांत्रिकीसाठी 1,71,656 विद्यार्थ्यांनी पात्रता मिळविली आहे. कृषी कोर्ससाठी 1,39,968, पशूवैद्यकिय 1,42,820, योगा आणि नॅच्युरोपॅथी कोर्ससाठी 1,42,750, बी-फार्मा आणि डी-फार्मा कोर्ससाठी 1,74,568 विद्यार्थ्यांना रँकिंग देण्यात आले आहे. नेहमीप्रमाणे विद्यार्थिनीच सीईटीच्या निकालात अव्वल ठरल्या आहेत. अभियांत्रिकीमध्ये 83,081 मुलांना आणि 88,575 मुलींना रँकिंग देण्यात आले आहेत. योगा आणि नॅच्युरोपॅथी कोर्ससाठी 62,742 विद्यार्थी आणि 8,008 विद्यार्थिनी पात्र ठरल्या आहेत. बीएससी कृषी कोर्ससाठी 61,898 विद्यार्थ्यांनी तर 78,070 विद्यार्थिनींनी त्याचप्रमाणे पशूवैद्यकीय कोर्ससाठी 62,776 विद्यार्थ्यांनी आणि 80,044 विद्यार्थिनींनी पात्रता मिळविली आहे. मात्र नॅच्युरोपॅथी विभाग वगळता उर्वरित सर्व विभागांमध्ये टॉपर्सच्या यादीत मुलांनीच स्थान पटकाविले आहे. अभियांत्रिकी विभागात पहिले नऊ क्रमांक मुलांचेच असून ते सर्वजण बेंगळूरमधील आहेत.
विद्यार्थ्यांना 7 ग्रेसमार्क
सीईटीमध्ये विद्यार्थ्यांना 7 ग्रेसमार्क देण्यात आले आहेत. गणित विषयाला 5, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र विषयांना प्रत्येकी 1 गुण ग्रेसमार्क म्हणून देण्यात आला आहे. यंदा सीईटीसाठी एकूण 2,16,559 जणांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2,10,829 जणांनी परीक्षा दिली होती. राज्यभरात एकूण 486 केंद्रांवर 16 आणि 17 जून रोजी सीईटी घेण्यात आली होती.
5 ऑगस्टपासून कागदपत्रांची ऑनलाईन पडताळणी होणार आहे. संरक्षण एनसीसी, क्रीडा, दिव्यांग आदी कोटय़ातून येणाऱया 10 टक्के विद्यार्थ्यांचे त्यांच्या त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. केवळ रँकिंग मिळविले म्हणूनच विद्यार्थी जागा वाटपासाठी पात्र ठरणार नाहीत. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतरच त्यांची पात्रता निश्चित केली जाईल.
कौन्सिलिंगसह सर्व प्रक्रिया ऑनलाईन
कौन्सिलिंग आणि कागदपत्रांच्या पडताळणीवेळी अनेक समस्या उद्भवत असल्याने कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाच्या सर्व टप्प्यातील प्रक्रिया ऑनलाईन केल्या जातील. जात-उत्पन्न दाखला, स्टडी सर्टिफिकेट, भाषिक अल्पसंख्याक प्रमाणपत्र व इतर प्रकारची प्रमाणपत्रे ऑनलाईन मार्फतच संबंधित सक्षम प्राधिकरणाकडून मिळविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सीबीएसई, आयसीएसई अभ्यासक्रम वगळता राज्याचा अभ्यासक्रम शिकलेल्या बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची गुणपत्रके देखील कर्नाटक परीक्षा मंडळाकडून ऑनलाईनद्वारे मिळवून जागा वाटपाची प्रक्रिया केली जाईल, अशी माहिती उच्च शिक्षणमंत्री डॉ. अश्वथ नारायण यांनी दिली.
मागील वर्षी बारावी उत्तीर्ण झालेल्या 40 हजार विद्यार्थ्यांनी यंदा सीईटी दिली आहे. या विद्यार्थ्यांचे रँकिंग केवळ सीईटीतील गुणांच्या आधारे निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाच्या संचालक रम्या यांनी दिली आहे. सीईटी आणि बारावी परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या गुणांचे एकत्रिकरण करुन रँकिंग निश्चित केले जाते. यंदा बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे रँकिंगही याचप्रकारे देण्यात आले आहेत. मात्र मागील वर्षी कोरोनामुळे बारावीची परीक्षा झाली नव्हती. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे रँकिंग केवळ सीईटीच्या आधारेच निश्चित करण्यात आले आहे. असे त्या म्हणाल्या.
पहिल्या तीन क्रमांकांचे मानकरी....
अभियांत्रिकी
प्रथम - अपूर्व टंडन, नॅशनल पब्लिक स्कूल, यलहंका
द्वितीय - सिद्धार्थ सिंग, चैतन्य टेक्नो स्कूल, बेंगळूर
तृतीय - आत्मकुरी व्यंकटमाद, चैतन्य टेक्नो स्कूल, बेंगळूर
नॅच्युरोपॅथी आणि योगा सायन्स
प्रथम - ऋषिकेश गांगुली, नॅशनल सेंटर फॉर एक्सलन्स, बेंगळूर
द्वितीय - व्रजेश शेट्टी, माधवकृपा इंग्लिश स्कूल, मनिपाल-उडुपी
तृतीय - कृष्णा एस. आर., चैतन्य टेक्नो स्कूल, बेंगळूर
कृषी
प्रथम - अर्जुन रवीशंकर, एचएएल पब्लिक स्कूल, बेंगळूर
द्वितीय - सुमित पाटील, चैतन्य टेक्नो स्कूल, बेंगळूर
तृतीय - सुदीप वाय. एम., विद्यानिकेतन पी. यु. कॉलेज, तुमकूर
पशूवैद्यकीय
प्रथम - ऋषिकेश गांगुली, नॅशनल सेंटर फॉर एक्सलन्स, बेंगळूर
द्वितीय - मनिष एस. ए., चैतन्य टेक्नो स्कूल, बेंगळूर
तृतीय - शुभा कौशिक, चैतन्य टेक्नो स्कूल, बेंगळूर
बी-फार्मा
प्रथम - शिशिर आर. के., नारायण ई-टेक्नो स्कूल, बेंगळूर
द्वितीय - ऋषिकेश गांगुली, नॅशनल सेंटर फॉर एक्सलन्स, बेंगळूर
तृतीय - अपूर्व टंडन, नॅशनल पब्लिक स्कूल, यलहंका