धारबांदोड्यात युवतीचा गळा चिरुन खून
झुडुपांत टाकला मृतदेह, परिसरात खळबळ : ओळख न पटल्याने पोलिसांसमोर आव्हान
फोंडा : फोंडा-बेळगाव महामार्गावरील प्रतापनगर-धारबांदोडा येथे मुख्य रस्त्यापासून 150 मीटर अंतरावर भूखंड पाडण्यात आलेल्या जागेजवळच एका अज्ञात युवतीचा गळा चिरून खून केलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ माजली आहे. मृतदेह 20 ते 25 वर्षे वयोगटातील युवतीचा असून तिने काळ्या रंगाचा टी शर्ट व जिन्स पॅन्ट परिधान केलेली आहे. काल सोमवारी सकाळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काजूच्या बागायतीत झाडाझुडूपात हा मृतदेह आढळलेला आहे.
युवतीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्यानंतर मृतदेह काजूच्या झाडाच्या जवळच फेकण्यात आला आहे. ज्या ठिकाणी हा मृतदेह सापडलेला आहे त्याठिकाणी वाहनांसाठी कच्चा रस्ता आहे. लोकवस्तीच्या जवळच हा प्रकार घडलेला आहे. घटनास्थळापासून विरूद्ध दिशेने प्रतापनगर धारबांदोडा येथे बिगरगोमंतकीयांची मोठी वस्ती असून येथील काही बिगरगोमंतकीयांचीही चौकशी करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच फोंड्याचे पोलिस निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांनी घटनास्थळी धाव घेत सदर घटनेचा पंचनामा केला. तातडीने फॉरेन्सिक टिमला पाचारण करण्यात आले. तसेच श्वानपथकाचीही मदत घेण्यात आली. परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव असल्याने याप्रकरणाचा छडा लावणे हे फोंडा पोलिसासमोर मोठे आव्हान आहे.
धारदार शस्त्राने गळा चिरून खून
फॉरेन्सिक टिमच्या माहितीनुसार मृतदेहाच्या गळ्यावर खोलवर जखमा आढळलेल्या असून सदर खून केवळ एक ते दोन दिवसांपूर्वी झालेला असावा. त्यामुळे रविवारच्या दिवशी हा मृतदेह निर्जनस्थळावर टाकून मारेकरी पसार झालेले असावेत. फॉरेन्सिक टिमने रक्ताचे नमुने गोळा केले आहेत. जोरदार पावसाच्या सरीमुळे तपासकामात काहीवेळ अडथळा निर्माण झाला. तरी पावसाची तमा न बाळगता स्वत: निरीक्षक विजयनाथ कवळेकर यांनी हातमोजे घालून परिस्थिती व्यवस्थित हाताळली. श्वानपथकाला घटनास्थळावरील नमून्याचा वास सुंगण्यासाठी दिला असता त्याने रस्त्याच्या दिशेने पळ काढला. यावरून मृतदेह टाकल्यानंतर रस्त्यावरून मारेकऱ्यांनी पळ काढल्याचा संशय बळावला आहे. दक्षिण गोवा अधीक्षक टिकम सिंग वर्मा हे घटनास्थळी दाखल झाले होते. फोंड्याचे उपअधिक्षक शिवराम वायंगणकर तसेच कुळे पोलिस स्थानकाचे निरीक्षक राघोबा कामत यांनी घटनास्थळी पाहणी केली.
रेल्वेचे तिकीट एकमेव पुरावा...
खुनाच्या घटनास्थळाजवळच मिळालेल्या बॅगमध्ये रेल्वे तिकिट सापडले आहे. तामिळनाडू येथून प्रवास केल्याचे तिकीटवरून स्पष्ट होत असून त्या अनुषंगाने तपास करण्यात येत आहे. खून कशासाठी आणि कोणी केला? यासाठी प्रथम मृतदेहाची ओळख पटणे अत्यंत गरजेचे आहे. मृतदेहाची जोपर्यंत ओळख पटत नाही तोपर्यंत याप्रकरणी तपास लावणे हे फोंडा पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. यासाठी फोंडा पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी राज्यातील विविध पोलिस स्थानकात लूकआऊट नोटीस जारी केली आहे.