सावित्रीबाईंमुळेच आमच्या मुली शिकल्या! बीड जिल्ह्यातून कोल्हापुरात आलेल्या वंजारी समाजातील महिलांची भावना
राजमाता जिजाऊ ब्रिगेडशी संवाद
कोल्हापूर प्रतिनिधी
गावाकडे आमची जमीन आहे. पण कोरडवाहू आहे. पावसावर सर्व काही अवलंबून असते. त्यामुळेच आई, वडील, सासू, सासरे आणि मुलांना गावात ठेवून ऊस तोडण्यासाठी दुसऱ्या गावात जावे लागते. तरीही आम्ही मुलांना शिकविले आहे. आमच्या मुली बारावीपर्यंत शिकल्या आहेत. त्यांची लग्नेही अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर लावली आहेत, शिक्षणाचे महत्व आणि प्रगतीचा मार्ग आम्हाला सावित्रीबाई फुलेंमुळे कळाला आहे, अशा शब्दात वंजारी समाजातील महिलांनी आपल्या भावना मांडल्या.
राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या प्रमुख सुनीता पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुधा सरनाईक, लता जगताप, सुवर्णा मिठारी, छाया जाधव, सुमन वाडेकर, भारती दिवसे, कल्पना शेलार, गीता हासुरकर यांनी फुलेवाडी रोडवरील बालिंगा गावाजवळील जुन्या खानसरीजवळ पाल टाकून तात्पुरत्या वास्तव्यास आलेल्या बीड जिल्ह्यातील ऊस तोडणी कामगार अर्थात फडकरी कुटुंबांची भेट घेतली. सावित्रीबाई फुले जयंतीदिनाचे औचित्य साधून त्यांना थंडीतून बचावासाठी स्वेटर व चादरी भेट दिल्या. त्यांच्याशी संवादही साधला. वंजारी समाजातील या फडकरी कुटुंबांतील शोभना, कांजी या महिलांना बोलते केल्यानंतर त्या म्हणाल्या, आम्ही शिकलो नसलो तरी आमच्या पोरांना शिकवले आहे. गावाकडे जमीन असली तरी त्यातून मोठे पीक येत नाही, त्यामुळे आमच्यासारखी कुटुंबे ऊस हंगामात तोडणीसाठी येतो. चार-सहा महिने आम्ही घरापासून, गावापासून दूर असतो. यावेळी आमचे आई, वडील, सासु, सासरे यांच्याकडे मुलांना ठेवतो. ते त्यांची शिक्षणासह इतर काळजी घेतात. हंगाम संपल्यावर गावी गेल्यावर वेगळा आनंद असतो. आमची मुले, मुली शिक्षण घेत आहेत. मुली बारावीपर्यंत शिकल्या आहेत. अठरा वर्षे पूर्ण झाल्याशिवाय आम्ही लग्न करत नाही. हळूहळू आमचा समाज बदलत आहे. शिक्षणाचे महत्व आम्हाला कळले आहे. ही सावित्रीबाई फुलेंची देन आहे, अशा भावना शोभना, कांजीने व्यक्त केल्या.