सीबीएसई निकालात मुलींची चमक कायम
दहावीचा 94 टक्के, बारावीचा 92.71 टक्के निकाल
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावी आणि बारावीचे निकाल शुक्रवारी जाहीर केले. बारावीच्या परीक्षेत 92.71 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर दहावीत 94 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दोन्ही परीक्षांमध्ये मुलांपेक्षा मुलींनी बाजी मारली आहे. इयत्ता बारावीमध्ये मुलांपेक्षा मुलींचा निकाल 3.29 टक्के जास्त आहे. तर दहावीच्या निकालात मुली 1.41 टक्क्यांनी पुढे आहेत. दोन्ही इयत्तांचा निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आला आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी-पालकांनी इंटरनेट-ऑनलाईन पद्धतीचा अवलंब केल्यामुळे दुपारच्या सुमारास सदर वेबसाईटची गती संथ झाली होती.
33 हजार विद्यार्थ्यांनी 95 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले. तर 1.32 लाख विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. त्रिवेंद्रमचा निकाल सर्वाधिक लागला असून तेथे 98.83 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रयागराजचा निकाल सर्वात कमी लागला असून तेथे 83.71 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील रहिवासी असलेल्या तान्या सिंग हिने बारावीच्या परीक्षेत 500 पैकी 500 गुण मिळवले आहेत.
तान्या सिंग बुलंदशहरच्या दिल्ली पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी आहे. निकाल लागल्यानंतर तान्याच्या घरात आणि शाळेत उत्सवाचे वातावरण आहे. तान्या सिंगने आपल्या यशाचे श्रेय स्वतःचे पालक आणि शाळेतील शिक्षकांना दिले आहे. आपल्याला आयएएस अधिकारी व्हायचे असून पदवी शिक्षणात आपण इतिहास हा विषय निवडणार असल्याचे तिने स्पष्ट केले.
35 लाखांहून अधिक परीक्षार्थी
सुमारे 35 लाखांहून अधिक विद्यार्थी दहावी आणि बारावी टर्म-2 च्या परीक्षेला बसले होते. यामध्ये दहावीच्या 21 लाख 16 हजार 290 तर बारावीच्या 14 लाख 54 हजार 370 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ही परीक्षा 26 एप्रिल 2022 ते 15 जून 2022 या कालावधीत देशभरातील विविध ठिकाणी हजारो केंद्रांवर घेण्यात आली.