मुली मागतात हुंडा
हुंडा देता न आल्याने युवक राहतात अविवाहित
भारतात हुंड्यावर बंदी असली तरीही अद्याप ही कुप्रथा काही प्रमाणात प्रचलित आहे. याचमुळे भारतात मुलीच्या विवाहाबद्दल तिच्या पालकांना काळजी सतावत असते. परंतु चीनमध्ये याच्या उलट घडते. तेथे हुंडा मुलांना नव्हे तर मुलींना दिला जातो. तेथे मुलींना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने लाखो युवक अविवाहित म्हणून जगत आहेत. चीनमध्ये एक मूल धोरण अनेक दशकांपर्यंत कठोरपणे राबविण्यात आले. या धोरणामुळे तेथील लैंगिक गुणोत्तर पूर्णपणे बिघडून गेले आहे. आता तर तेथी मुलींकडून मागणी होणारा मोठा हुंडा देता न आल्याने युवकांचा विवाह जुळत नसल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत चीनमधील एका अर्थतज्ञाने इंटरनॅशनल वेडिंगचा सल्ला दिला आहे.
झियामेन युनिव्हर्सिटीच्या अर्थशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डिंग शांग्फा यांनी युवांना विदेशात विवाह करण्याचा सल्ला दिला आहे. याकरता त्यांनी रशिया, कंबोडिया, व्हिएतनाम आणि पाकिस्तान यासारख्या देशांमधून वधू आणण्याचा सल्ला दिला आहे. चीनमध्ये सुमारे 3.5 पुरुषांना आयुष्याचा जोडीदार मिळणार नसल्याची स्थिती आहे. तेथील वधूकरता 60-70 लाख रुपयांचा हुंडा द्यावा लागत आहे. चीनमध्ये ग्रामीण भागातील युवक सरासरी 2.4 लाख रुपये कमावतात. अशा स्थितीत त्यांना चिनी वधू मिळणे अशक्यप्राय ठरल्याचे त्यांनी म्हटले आहे. डिंग शांग्फा यांच्या सल्ल्यावर चीनमध्ये गदारोळ निर्माण झाला आहे. महिलांनी याला विरोध केला असता अनेक युवक याच्या बाजूने उभे ठाकले आहेत. अन्य देशांमधील युवती घर, गाडी आणि हुंड्याची मागणी करत नाही. तसेच ती गुणवान आणि मेहनती असते असे या युवकांचे सांगणे आहे. तर आंतरराष्ट्रीय विवाहांमुळे अन्य देशांच्या भाषांचा वापर वाढण्याची भीती काही लोक व्यक्त करत आहेत.