साताऱ्यात प्रियसीनेच केला प्रियकराचा खून
रोशनीने पैशासाठी योगेशला संपविले
साताराः (दहिवडी)
गोंदवले बु. (ता. माण) येथील योगेश सुरेश पवार याचा प्रेयसी रोशनी माने रा. नरवणे (ता. माण) हिने आई पार्वती माने व अन्य काही साथीदारांच्या मदतीने खून केल्याचे दहिवडी पोलिसांनी निष्पन्न केले. योगेशच्या खूनप्रकरणी प्रेयसी रोशनी व तिची आई पार्वती व अन्य दोघांना अटक केली असून अन्य साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, योगेश पवार व रोशनी माने हिचे काही दिवसापासून प्रेमसंबंध होते. त्या संबंधातून योगेशने रोशनी हिला लाखो रुपये उसने दिले होते. योगेशने उसने दिलेले पैसे माघारी घेण्यासाठी तगादा लावला होता. मंगळवारी दि. १८ रोजी रोशनीने योगेशला फोन केला की, तू नरवणे येथे ये तुला भेटायचे आहे आणि उसने दिलेले पैसे माघारी द्यायचे आहेत. असे सांगून नरवणे येथे बोलवून घेऊन अन्य साथीदारांच्या मदतीने धारदार शस्त्राने वार करून योगेश याचा खून केला व त्याच्याच स्विफ्ट कारमध्ये मागील सीटवर टाकून माळशिरस तालुक्यातील फडतरी गावच्या नजीक असलेल्या कॅनॉलमध्ये हातपाय बांधून टाकले. दहिवडी पोलिसांनी क्रेनच्या साह्याने स्विफ्ट कार बाहेर काढली.
सपोनि दत्तात्रेय दराडे यांनी दोन दिवसात खुनाचा लावला छडा..
मृत योगेश पवार यांच्या भावाने दहिवडी पोलिसांमध्ये योगेश हरवल्याची तक्रार दिली होती. सपोनि दराडे यांनी तपासाचे चक्रे गतिमान करून तांत्रिक बाबीच्या साह्याने तपास सुरू केल्यानंतर योगेश हा शेवटी नरवणे येथे गेल्याचे निष्पन्न झाल्यानंतर प्रेयसी रोशनी व आई पार्वती हिची कसून चौकशी केली असता. त्यांनीच अन्य साथीदारांच्या मदतीने योगेशचा खून केल्याचे सांगितले. प्रेयसी रोशनी व आई पार्वती व अन्य दोघांना अटक केली असून अन्य साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.