एकतर्फी प्रेमातून मुलीस मारहाण
कराड :
महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीस एकतर्फी प्रेमातून मारहाण करत तिला ओढत नेण्याचा प्रयत्न युवकाने केला. कराडच्या विद्यानगरीत एका महाविद्यालयाच्या बसथांब्यावर नुकतीच ही घडली. या प्रकाराने मुलीच्या मैत्रिणींनी कराड उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या निर्भया पथकाच्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधला. निर्भया पथक पोलीस गाडीचा सायरन वाजवत वेळेत पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला. संशयित युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर बाललैंगिक अत्याचार (पोक्सो) कायदा कलन्मावये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कराडलगत विस्तारलेल्या विद्यानगरीत अनेक महाविद्यालये आहेत. साहजिकच युवक, युवतींचा मोठा वावर या परिसरात असतो. दरम्यान, एका मुलीवर युवकाचे एकतर्फी प्रेम असल्याचे निर्भया पथकाच्या पोलिसांनी सांगितले. तो त्या मुलीचा पाठलाग करून तिचे हॉटेल, कॅफेमध्ये फोटो काढत होता.
अचानक आला अन् आक्रमक झाला
महाविद्यालयाची वेळ संपल्यानंतर कराड तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी विद्यानगर येथे बसथांब्यावर मैत्रिणींसमवेत बसची वाट पहात थांबली होती. याचवेळी अचानक तिच्यावर एकतर्फी प्रेम करणारा युवक तिथे आला. त्याने मुलीला तू माझ्याबरोबर चल, अशी धमकी दिली. मुलीने नकार देताच युवकाने तिला मारहाण सुरू केली. मारहाण करून तो तिला ओढत त्याच्या गाडीकडे नेऊ लागला. युवती आरडाओरडा करत त्याला प्रतिकार करत होती. हा गोंधळ सुरू असतानाच युवतीच्या मैत्रिणींनी प्रसंगावधान राखत कराड उपविभागीय कार्यालयाच्या निर्भया पथकाच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून घडला प्रकार सांगितला.
निर्भया पथकाची तात्काळ धाव
निर्भया पथकाच्या हेल्पलाईन क्रमांकावर मदतीसाठी फोन आल्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर, निर्भया पथकाच्या दीपा पाटील, मयूर देशमुख, अमोल फल्ले, हर्षद साळुंखे यांना वेळ न घालवता विद्यानगर येथे पाचारण केले. निर्भया पथकाचे पथक पोलीस गाडीतून सायरन वाजवत वेगाने घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी संशयित युवक मुलीस ओढत होता तर मुलीच्या घाबरलेल्या मैत्रिणी त्याला असे करू नकोस, अशी विनंती करत होत्या. निर्भया पथकाचे पोलीस घटनास्थळी पोहोचताच त्यांनी युवकास ताब्यात घेतले. घडल्या प्रकाराची मुलीसह तिच्या मैत्रिणींकडून माहिती घेतली. यानंतर संशयित युवकास ताब्यात घेऊन उपविभागीय कार्यालयात आणण्यात आले.
पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल
अल्पवयीन मुलीस एकतर्फी प्रेमातून मारहाण करणाऱ्या संशयिताकडे स्वत: उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी चौकशी केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर यांनी संशयित मुलासह मुलीच्या पालकांना हा प्रकार कळवला. संशयिताच्या धमक्या व त्याचे कृत्य पाहता मुलीसह तिचे पालक प्रचंड भयभीत झाले होते. त्यांचे निर्भया पथकाच्या अमित बाबर, दीपा पाटील यांनी समुपदेशन केले. यानंतर शहर पोलीस ठाण्यात यासंदर्भात संशयितावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.