नागलला हरवून गिल उपांत्यपूर्व फेरीत
वृत्तसंस्था/पुणे
येथे सुरू असलेल्या एटीपी चॅलेंजर 75 महाराष्ट्र खुल्या पुरूषांच्या टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत ब्रिटनच्या फेलिक्स गिलने भारताच्या सुमित नागलचा पराभव करत एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली.
या स्पर्धेतील झालेल्या एकेरीच्या सामन्यात गिलने सुमित नागलचा 7-6 (7-4), 0-6, 6-3 अशा सेट्समध्ये पराभव करत शेवटच्या 8 खेळाडूंत स्थान मिळविले. या लढतीत मात्र सुमित नागलने गिलला विजयासाठी तब्बल अडीच तास झुंजविले. दुसऱ्या एका सामन्यात लिथुआनियाच्या आठव्या मानांकीत इदास बटविलासने चीन तैपेईच्या तुंग वू याचा 6-3, 6-0 असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला. हा सामना 58 मिनिटे चालला होता. अन्य एका सामन्यात जपानच्या इमामुराने ब्रिटनच्या द्वितीय मानांकीत जे क्लार्कला पराभवाचा धक्का दिला. इमामुराने हा सामना 6-2, 6-4 असा जिंकून शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले.