अमेरिकेकडून तालिबानला गिफ्ट
अमेरिकन नागरिकाची मुक्तता : हक्कानीवरील इनाम हटविले
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेने तालिबानसोबतचे स्वत:चे संबंध सुधारण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत. अफगाण तालिबानने दोन वर्षांपासून कैदेत असलेल्या अमेरिकनन नागरिकाची मागील आठवड्यात मुक्तता केली होती. यानंतर आता अमेरिकेने तालिबानचा प्रमुख पदाधिकारी सिराजुद्दीन हक्कानीवरील 10 दशलक्ष डॉलर्सचे इनाम हटविले आहे. अफगाणिस्तानच्या अंतर्गत मंत्रालयाने याची माहिती दिली आहे. हक्कानीच्या अटकेसाठी माहिती दिल्यास ही रक्कम इनामादाखल दिली जाणार होती.
हक्कानीवरील इनाम हटविण्याची घोषणा करण्यात आली असली तरीही एफबीआयच्या वेबसाइटवरून इनामाच्या यादीतील हक्कानीचे नाव अद्याप हटविण्यात आलेले नाही. या यादीत हक्कानीवर अफगाणिस्तानात अमेरिका आणि नाटोच्या सैनिकांच्या विरोधात हल्ले घडवून आणण्याचा आरोप आहे.
तालिबानकडून अमेरिकन नागरिकाची मुक्तता करण्यात आल्यावर अमेरिकेने हक्कानीला हा दिलासा दिला आहे. जॉर्ज ग्लीजमॅन हे अडीच वर्षांपासून अफगाणिस्तानात तालिबानच्या ताब्यात होते. त्यांची मुक्तता करविण्यात आली असल्याचे अमेरिकेचे विदेशमंत्री मार्को रुबियो यांनी सांगितले आहे.
65 वर्षीय ग्लीजमॅन यांना अडीच वर्षांपासून तालिबानकडून अटक करण्यात आली होती. ग्लीजमॅन हे अफगाणिस्तानात पोहोचल्यावर ही कारवाई करण्यात आली होती. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विशेष प्रतिनिधी एडम बोहलर आणि तालिबानी अधिकारी तसेच कतारच्या अधिकाऱ्यांकडून याप्रकरणी चर्चा करण्यात आल्यावर ग्लीजमॅन यांची मुक्तता करण्यात आली होती.