पेंडूर गावात महाकाय अजगराचे दर्शन
ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण ; वनविभागाच्या मदतीने ग्रा. प. ने बंदोबस्त करण्याची मागणी
कट्टा / वार्ताहर
मालवण तालुक्यातील कट्टा नेरुरपार मार्गे कुडाळ येथे जाण्यासाठी असलेल्या हमरस्त्यावर पेंडूर गावात सुमारे 15 ते 20 फूट लांबीचा भला मोठा दांड असा अजगर आढळून आला. रस्त्याने जात असलेल्या गावातील वाहन चालक व सोबत असलेल्या गावातील व्यक्तीला हा भला मोठा अजगर रस्ता ओलांडताना दिसला . त्यातील एका युवकाने त्याचा व्हिडिओ आपल्या मोबाईल मध्ये केला. सध्या हाच व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. परंतु व्हिडिओ मध्ये दिसत असलेला असा महाकाय अजगर प्रथमच गावात आढळून आल्यामुळे गावातील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले झाले आहे. कधीही हा भला मोठा अजगर येऊन आपल्या गुरांना गिळंकृत करेल की काय अशी भीती प्रत्येकाच्या मनात येत आहे. गावाच्या एका बाजूने कर्ली नदी वाहते. त्या नदीच्या पात्रातून मगर व यासारखी जनावरे येतं असतात. एकदा भली मोठी मगर पेंडूर तलावात सापडली होती. ती येथील स्थानिक नागरिकांनी वनविभागाच्या मदतीने पकडून पुन्हा नदीत नेऊन सोडली होती. त्याचप्रमाणे या अजगराचा देखील बंदोबस्त करावा जेणेकरून तो कोणत्याही शेतकऱ्यांना नुकसान पोहोचवणार नाही. अशी मागणी पेंडूर ग्रामस्थ व शेतकरी वर्गातून केली जात आहे.