नितीश कुमार सरकारकडून घुमजाव
विषारी दारूने मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना भरपाई ः पूर्वी दिला होता नकार
वृत्तसंस्था/ पाटणा
विषारी दारूने अनेक जणांचा बळी गेल्यावर बिहारमधील नितीश कुमार सरकारला स्वतःच्या जुन्या भूमिकेवरून घुमजाव करावे लागले आहे. विषारी दारूच्या प्राशनामुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची मदत राज्य सरकार करणार असल्याचे मुख्यमंत्री नितीश यांनी म्हटले आहे. बिहारमध्ये 2016 मध्ये दारूबंदी लागू करण्यात आली होती. 2016 पासून आतापर्यंत विषारी दारूमुळे जीव गमावलेल्या सर्वांच्या कुटुंबीयांना हा मदतनिधी दिला जाणार असल्याचे नितीश यांनी स्पष्ट केले आहे.
मद्यप्राशनामुळे जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांनी प्रशासनाला यासंबंधी माहिती द्यावी. संबंधित विषारी दारू कुठून खरेदी केली हे सांगत असल्यास आम्ही त्यांना मदत करू. विषारी दारूच्या प्राशनामुळे लोक मृत्युमुखी पडत असल्याने दुःख वाटतेय. परंतु अशा लोकांच्या कुटुंबीयांची आम्ही काळजी घेणार आहोत. प्रशासनाकडून दारूबंदी लागू करण्यात आली असूनही लोक विषारी दारू पित आहेत. यातूनच काही जणांचा मृत्यू होत असल्याचे नितीश कुमार म्हणाले.
विषारी दारूच्या प्राशनामुळे जीव गमावलेल्या लोकांच्या कुटुंबीयांची चिंता असल्याचे सांगत नितीश कुमार यांनी भरपाईची घोषणा केली आहे. हा मदतनिधी मुख्यमंत्री रिलिफ फंडकडून दिला जाणार आहे. परंतु याकरता मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबीयांना संबंधितांनी चुकून मद्यप्राशन केले होते असे नमूद करावे लागणार आहे. नितीश कुमार यांनी यापूर्वी विषारी दारूचे प्राशन केल्यानंतर जीव गमावलेल्या लोकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यास स्पष्ट नकार दिला होता. परंतु राज्यातील विरोधी पक्ष भाजपकडून वारंवार लक्ष्य करण्यात येत असल्याने नितीश कुमार यांना अखेर स्वतःची भूमिका बदलावी लागली आहे.