गझल-काव्याने मिळविली दाद
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव
कलावकाशतर्फे रविवारी संध्याकाळी ममता सपकाळ व पूजा भडांगे यांच्या गझल व काव्य वाचनाच्या कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. पूजा भडांगे यांनी ममता सपकाळ यांना कविता लिहिण्यामागची प्रेरणा, गझलकडे झालेला त्यांचा प्रवास या अनुषंगाने प्रश्न विचारत बोलते केले व या दोघींनी आपल्या कविता सादर केल्या.
ममता सपकाळ म्हणाल्या, प्रथम मी गझल लिहिली तेव्हा ती गझल की बाराखडी, असा प्रश्न विचारला गेला. पण सुधीर दराडे यांनी मला सातत्याने मार्गदर्शन केले. तुम्ही लिहीत राहा, असा आग्रह त्यांनी सतत केला. त्यामुळे साधारण 65 कविता मी लिहू शकले. त्यातील 30 ते 40 कविता काव्यांजली या वॉलवर पोस्ट केल्या. न पाहिलेल्या, भेटलेल्या सुधीर दराडे यांनी मला नेहमी प्रोत्साहन दिले.
आपलं जगणं किंवा अवलोकन लेखणात येतंच. प्रत्येक वेळी आपलाच अनुभव आपण लिहितो असे नाही तर आसपासच्या घटनांचे अवलोकन करूनही आपण लिहीत असतो, असे सांगून त्यांनी
‘जे नको होते ते मला घरभर मिळाले
वेदनेवर वेदनेचे थर मिळाले’
ही गझल सादर केली. त्यानंतर पूजा यांनी उन्हावरची बहारदार कविता सादर केली.
‘उन्हामागे ऊन थांबले उन्हात
तुझ्या सावलीत येण्यासाठी
या कवितेने बाहेर पावसाचे वातावरण असताना पूजाच्या ‘ऊन’ या कवितेने रसिकांवर ऊबदार शाल पांघरली. यानंतर ममता सपकाळ यांनी आईकडूनच शब्दसंग्रहाचा आणि लेखनाचा वारसा आल्याचे सांगितले. तिचे अनुभव ही माझी शिदोरी होती. त्यामुळे तिच्या जाण्यानंतर विलक्षण पोकळी निर्माण झाली, असे सांगून
‘काय काय समजून घेऊ, तुम्हीच घ्या समजावून मला
एक दिवसासाठी माझी आई द्या आणून मला’
ही कविता सादर केली. तसेच
‘काळजाची जरा काळजी वाटते, घे तुझ्याकडे अथवा कर माझे मला
तू नको ना मध्ये हात सोडू असा, मग किती भयंकर वाटते मला
ही कविता सादर केली. समाजमाध्यम आणि पुस्तके याबद्दल बोलताना त्यांनी मी सोशल मीडियाकडे खूप गांभीर्याने पाहाते व पुस्तकांचा आदर करते. पुस्तक हातात आले की एक वेगळेच जग समोर येते. पुस्तके कधीच एकटं पाडत नाहीत, असा अनुभव सांगितला. पूजा भडांगे यांनी ‘सावळबाधा’ ही कविता सादर केली. अरुणा ढेरे यांच्या कृष्णकिनारा पुस्तकाच्या वाचनानंतर ही कविता सुचली, पण ती इंदिरा संत यांची कविता म्हणून ओळखली गेली. मात्र, आपल्या कवितेला अशा मोठ्या कवयित्रीचे नाव लाभावे, हाच पुरस्कार असल्याचे त्यांनी नमूद केले. यानंतर त्यांनी बेळगाववरची प्रसिद्ध कविता सादर केली. प्रास्ताविक वैभव लोकुर यांनी केले. स्वाती कुलकर्णी यांनी आभार मानले.