For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

घर कौलारू...

06:53 AM Apr 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
घर कौलारू
Advertisement

आठवणींच्या आधी जाते जिथे मनाचे निळे पाखरू

Advertisement

खेड्यामधले घर कौलारू घर कौलारू

आणि

Advertisement

आज अचानक एकाएकी मानस लागे जेथे विहरू

खेड्यामधले घर कौलारू घर कौलारू

अशा ओळी धरून दोन गाणी झाली. त्यातलं एक गदिमांनी लिहिलेलं आणि दुसरं अनिल भारती यांचं आहे. अनिल भारती यांच्या गीताला संगीत आहे मधुकर पाठक यांचं आणि स्वर मालती पांडे यांचा. तर गदिमांचं गाणं आशाताईंच्या स्वरात आहे आणि त्याला बाबूजींनी संगीत दिलंय. नुसतं ‘खेड्यामधले घर कौलारू’ या एका कॅचलाइनवर ही पूर्ण स्वतंत्र दोन गाणी झाली. दोन्हीही लोकप्रिय झाली. घर ही गोष्ट माणसाला हळवं करते. दूर तिकडे परदेशी असलेल्या लोकांना

नवलाख तळपती दीप विजेचे येथ

उतरली तारकादळे जणू नगरात

परि स्मरते आणिक करते व्याकुळ तेव्हा

त्या माजघरातिल मंद दिव्याची वात

असं आपलं घर खुणावत असतं. कशासाठी माणसाला घर एवढं हवं असतं? पशुपक्षी आपल्या घराचे एवढे आदी असतात का? एकदा घरटं सोडून निघून गेलेली पक्ष्यांची पिल्लं पुन्हा तिथे येत नाहीत. आपलं स्वत:चं स्वतंत्र घरटं बांधतात. आता माणसांची पिल्लं पण सातासमुद्रापार भरारी घेतात आणि आईबापांना रिकाम्या घरट्यात एकटं जगायला सोडून निघून जातात. थकलेल्या, दमलेल्या म्हाताऱ्यांनी एकटं मिटीमिटी जगायचं असतं. ज्यांनी हे वास्तव स्वीकारलंय ते लोक हेही आयुष्य मजेत घालवतात. आर्थिकदृष्ट्या सक्षम असतील तर चिंता नसते पण तसं नसेल तर वेळ कठीण येते त्यांची. पण हे झालं मागे राहणाऱ्यांचं. उडून गेलेल्यांचं काय? पराकोटीची स्वच्छता, गुणग्राहकता, मिळणारा पैसा, उंचावलेलं राहणीमान यात सुरुवातीला घराची आठवणही येत नाही. खरा विषय सुरू होतो तो सुस्थापित झाल्यानंतर. जे मिळवायचं ते मिळवून झालेलं असतं. म्हणायला सगळं काही घरात असतं पण तिथले लोक सण साजरा करतात किंवा गेट टुगेदर करतात तेव्हा आपल्या नातेवाईकांची, आईवडिलांची, घराची आठवण छळायला लागते. हल्ली पाश्चात्य देशात आपलं मूळ गाव आणि घर शोधत फिरण्याचा ट्रेण्ड आहे. तिथले लोक तसं ते शोधत फिरताना दिसतात. आणि ते पाहणारे आपण मनाने आपल्या घरी जाऊन पोहोचतो. मग वेळ पाहून घरच्यांना व्हिडिओ कॉल होतो. बोलणं होतं. सगळं होतं पण आठवणी काही पिच्छा सोडत नाहीत. मग तिकिटं काढली जातात आणि घराकडे प्रवास सुरू होतो.

‘रात्र थोडी सोंगे फार’ अशी परिस्थिती असते. एकेका ठिकाणी चोख वाटलेला एकेक दिवस आणि निवांत बसायला, घराशी आईबाबांशी बोलायला न उरलेला वेळ आपल्याला कुरतडून काढत असतो. जायचा दिवस जवळ येतो. माणूस उगाच घराच्या भिंती दारांवर हात फिरवतो. चौकटीत टेकून उभा राहतो. मागच्या अंगणात जाऊन येतो. कट्ट्यावर क्षणभर बसतो. शहरातलं घर असेल तर उगाचच गॅलरीत उभा राहतो. जवळच्या मार्केटमध्ये जाऊन येतो. गावातलं घर असेल तर रानवाटांवर भटकून येतो. तो परिचित गंध, ती दृश्ये सगळं सगळं मनात साठवून घेतो.

ते माझे घर ते माझे घर

जगावेगळे असेल सुंदर

असं म्हणत आपलं घर मनाच्या बाहूंत कवळून घेतो. विमान आकाशात झेपावल्यावर पुलंच्या भाषेत आपण का चाललोय, हा प्रश्न त्याला छळत राहतो.

चालसी किती जगे किती युगे मुसाफिरा

एकटेपणा तुझा असह्य हो चराचरा ाdर

माणसांनी भरलेल्या प्रचंड मोठ्या पोकळीत आपण मात्र एकटेच असतो तेव्हा. कारण घर मागेच सुटलेलं असतं. लहानपणी त्या पलीकडच्या अमुकसोबत किती खेळायचो ना? तासनतास धूळमातीत लोळायचो, त्या कलमाखाली जाऊन कैऱ्या पाडायचो, त्या मामाने एकदा रट्टे दिले होते मस्ती केल्याबद्दल ते? ती मामी किती लाड करायची! आजीने इतका खाऊ दिलाय.. नुसत्या आठवणी... कल्लोळ असतो.. आजीआजोबा केव्हाच अनंताच्या प्रवासाला निघून गेलेले असतात. आईबाबा, काका, मामा आता थकलेत. आई तर मागच्या वेळेपेक्षा किती थकलेली, ओढलेली दिसते! ते काही नाही. पुढच्यावेळी त्यांना आपल्यासोबत घेऊन यायचं. असा विचार मनात पक्का होतो. पण आईबाबा यायला तयार होत नाहीत. ते एकला चलो रे पत्करतात. पण एकाएकी एक जोडीदार उठून निघून जातो आणि मग पुन्हा एकदा भयाण एकटेपण. मग ते एकटं राहिलेलं म्हातारं माणूस मोठ्या झालेल्या घरात फिरत चाचपडत राहतं. शहरात असेल तर गर्दीतलं एकटेपण भयाण असतं तर खेड्यात असेल तर रानातलं एकटेपण..

काही ठिकाणी अशी एका घरातली म्हातारी माणसं एकत्र येऊन राहतात. आणि एकटेपण जमेल तेवढं सुसह्य करतात. मग बसल्या बसल्या आठवतं. मुलं मोठी होत असताना हे एवढं मोठं घरही लहान वाटायचं. घरभर पसारा असायचा कितीतरी. भिंती चित्रविचित्र रंगांनी आणि चित्रांनी भरलेल्या असायच्या, पुस्तकं, वह्या, कागद, पेन्सिल, पेनं एक ना दोन हजार वस्तू असायच्या चौफेर. मग वयं वाढायला लागली आणि असंख्य प्रकारचे कपडे, परफ्यूम, स्टाइल जेल, नव्या बाइकसाठी केलेला हट्ट, भांडणं.. आता ती बाइक चालवायलाच कुणी नाही. तिकडे घेऊन जा म्हटलं तर हसतो. आणि निघून जातो. मुलगी असेल तर सौंदर्यप्रसाधनं, साड्या, ड्रेस.... तिचा विरह तर दोनदा होतो. लग्नाने आणि मग परदेशी झाली म्हणून. सांडलेल्या आठवणी गोळा तरी किती कराव्यात? आणि केल्या गोळा तर ठेवायच्या कुठे त्या? काही कळत नाही. ओटी शांत असते. अंगण रिकामं असतं. माजघरात काळोख गप्प पडून असतो.

स्वयंपाकघरात दोघांपुरता भात बुडकुल्यात शिजत असतो. पूर्वी केलेल्या पंचवीस माणसांच्या स्वयंपाकाच्या आठवणी अधूनमधून दरवळतात तेवढ्याच. बाकी गप्पगार. याच माजघरात दरवर्षी सहस्रावर्तनं व्हायची. मोदकाची, श्रीखंडपुरीची पंगत व्हायची. आरतीमंत्रपुष्पाने तासनतास गर्जायचं माजघर. त्याचवेळी स्वयंपाकघरात

कॉफीच्या दरवळाने ठाण मांडलेलं असायचं. कुळाचार, ब्राह्मण, सवाष्णी, कुमारिका, श्रावणातल्या कहाण्या, आदित्यराणूबाईची पूजा...आता कुठला उत्साह म्हणा? आहेच कोण ज्याच्या हातावर प्रसाद ठेवावा? करायचं म्हणून करायचं झालं. घरं अशी असतात. पोटात खूप खूप माया घेऊन उभी असतात. एकदा जा. अंतराची कुलपं उघडा. म्हाताऱ्यांना भेटा. घरं हसतात.

-अॅड. अपर्णा परांजपे-प्रभु

Advertisement
Tags :

.