For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फुलांच्या राशीत घन:शामजी शोभून दिसत होते

06:24 AM Feb 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
फुलांच्या राशीत घन शामजी शोभून दिसत होते
Advertisement

अध्याय एकतिसावा

Advertisement

नाथ महाराज सांगतात, कळीकाळही आज्ञेत वागत असल्याने श्रीकृष्ण कितीही वर्षे अवतारकार्य चालू ठेऊ शकले असते. तरीपण जे कार्य करायचे आहे ते पूर्ण झाल्यावर त्यांनी देहाचा त्याग करायचे ठरवले. श्रीकृष्णाचे निजधामगमन हे ब्रह्मादिकाना अतर्क्य असल्याने ते त्याचे वर्णन करू शकले नाहीत पण सद्गुरू जनार्दनस्वामी यांची पूर्ण कृपा असल्याने मी हे व्याख्यान विशद करून सांगेन. सद्गुरूंचे स्थान हे ब्रह्मादिकांच्या वरचे आहे असे येथे सांगून नाथमहाराज पुढे सांगतात, श्रीकृष्णनाथांच्या निर्वाणाचा प्रसंग पाहण्यासाठी तसेच त्यावेळचे त्यांचे दिव्य दर्शन घेण्यासाठी समस्त देवगण स्वत: तिथे हजर झाले. देवांची विमाने एक एक करून तेथे येऊ लागली. सर्वप्रथम ब्रह्मदेव तेथे आले. नंतर शिव भवानीसहित आले. देवेंद्र त्यांच्या दरबारातील मुख्य मानकऱ्यासह आले. सनकादिक मुनींसारखे मुख्य मुनी, दक्षादि प्रजापती तसेच अर्यमादि पितर, कपिलादि तेथे धावले. गंधर्व विद्याधर, यक्ष, चारण, किन्नर आणि बिभीषणादि थोर राक्षस, पाताळींचे प्रन्नग, महोरग हेही आले. त्तात्रेयांसारखे ब्राह्मण आले, निर्वाणप्रसंगाचे कौतुक पहायला नारद आले.

पक्षी प्रमुख गरुड आले. रंभा, उर्वशी, मेनका ह्या अप्सरा तसेच श्रीकृष्ण दर्शनाचे महात्म्य जाणून असलेल्या अष्टनायिका आल्या. श्रीकृष्ण हे श्रीविष्णूंचे अवतार आहेत हे ज्यांना अलीकडेच समजले होते त्या देवपरिवाराने त्यांच्या दर्शनाचा ध्यास घेतला होता. आता ही मूर्ती लोप पावणार हे लक्षात आल्याने, तेही त्यांचे दर्शन घेण्यासाठी गडबडीने तेथे आले. श्रीकृष्णांना पहायला, त्यांच्या मनोहर रूपाचे मनसोक्त दर्शन घ्यायला जणू सगळ्यांचेच डोळे आसुसलेले होते. सर्वांना श्रीकृष्णाच्या लीला आधीपासूनच माहित होत्या पण ते श्रीविष्णूंचा अवतार आहेत हे त्यांना अलीकडेच समजले होते. त्यामुळे त्यांना त्यांचे दर्शन घ्यायची ओढ नव्यानेच लागली होती. त्यात आता ते पृथ्वीतलावरील अवतार कार्य समाप्त करून निजधामाला जाणार असल्याने पुन्हा श्रीकृष्णदर्शन कुठून होणार ह्या विचाराने सर्व देवगणांनी अत्यंत उत्साहाने तेथे हजेरी लावली होती. अनुपम सौंदर्याची सीमा असलेल्या घनश्याम सुंदराची प्रतिमा एकदा नाहीशी झाली की, पुन्हा दिसणार नाही ह्या विचाराने ते सर्व अस्वस्थ झाले होते.

Advertisement

श्रीकृष्णनाथांच्या दर्शनाच्या ओढीने आणि गोडीने इतर सेवक कामे बाजूला सारून सर्वजण तेथे आलेले होते. ज्याप्रमाणे वारीसाठी वारकरी पंढरपूरला जमल्यावर तेथे पांडुरंगाच्या भजनपूजनाशिवाय अन्य कोणताही कार्यक्रम नसतो त्याप्रमाणे श्रीकृष्णांच्या निर्वाणप्रसंगी तेथे जमलेले समस्त देवगण तेथे येत असताना आणि तेथे जमल्यावरही श्रीकृष्णांच्या लीला वर्णन करण्यात, त्यांच्या चरित्रातील प्रसंग एकमेकांना सांगण्यात, त्यांच्यावर रचलेली गाणी म्हणण्यात दंग होते. आकाशात विमानातून दाटी केलेल्या देवगणांनी हृशिकेशाच्या समोर आल्यावर त्याचा जयजयकार करायला सुरवात केली. श्रीकृष्णनाथांना बघितल्यावर त्यांची भक्ती उचंबळून आली आणि त्या सर्वांनी एकदमच भगवंतांवर पुष्पवृष्टी करायला सुरवात केली. त्या पुष्पवृष्टीमुळे स्वर्गातील दिव्य फुलांच्या राशी भगवंतांच्या आजूबाजूला रचल्या गेल्या. त्यामध्ये घन:शाम शोभून दिसत होते. ब्रह्मदेव येऊन भगवंतांच्या पुढे उभे राहिले. सदाशिवांसारख्या अन्य विभूतीही भगवंतांच्या दृष्टीस पडल्या. इंद्रादिक देवही तेथेच होते. त्या सर्वांना पाहून कमळाच्या पाकळ्यांसारखे असलेले त्यांचे डोळे भगवंतांनी झाकून घेतले. ते स्वत: परिपूर्ण असल्याने डोळे झाकलेले असले काय आणि उघडे असले काय त्यांच्या आत्मस्वरुपात काहीच फरक पडत नव्हता. आपल्याला पाहून भगवंतांनी डोळे का झाकून घेतले हाच प्रश्न सर्व देवगणांना पडला होता.

क्रमश:

Advertisement
Tags :

.