कुरुकली ग्रामपंचायतीवर महिलांचा घागर मोर्चा : पिण्याच्या पाण्यासाठी महिला आक्रमक
कागल तालुक्यातील कुरुकली येथे गेल्या साडेनऊ महिन्यापासून गावातील नळ पाणीपुरवठा सुरळीत नसल्याच्या कारणास्तव पाणी प्रश्नी आक्रमक झालेल्या शेकडो महिलांनी आज सकाळी ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढून प्रशासनाचा निषेध केला.
कुरुकली,(ता.कागल) येथील नळ पाणीपुरवठा योजना वारंवार बंद पडत आहे.त्यामुळे गावात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत नाही.गेल्या कांही महिन्यापासून ही समस्या भेडसावत आहे.या प्रश्नी ग्रामस्थांनी वारंवार ग्रामपंचायत प्रशासनास तोंडी व लेखी सूचना देऊन देखील संबंधितांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
गुरुवारी हंबीररावनगर परिसरातील नागरिकांनी शेकडो महिलांच्या सहीचे निवेदन ग्रामपंचायत कार्यालयास दिले होते.पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास शुक्रवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयावर कार्यालयावर घागर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा या निवेदनाद्वारे दिला होता. त्यानुसार आज सकाळी कुरुकली येथील हंबीरराव नगरमधील आक्रमक झालेल्या शेकडो महिलांनी घागरी हातात घेऊन ग्रामपंचायत कार्यालयावर धडक दिली.
'पिण्यासाठी पाणी द्या,नाहीतर खुर्च्या खाली करा' गली गली मे शोर है,ग्रामपंचायत मे सब चोर है' अशा घोषणा देवून परिसर दणाणून सोडला.ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. अशी जोरदार मागणी करत सुमारे दोन तास ग्रामपंचायत कार्यालयासमोरच महिलांनी ठाण मांडले होते.
सरपंच व सदस्य कार्यालयात होते. त्यामुळे संतप्त महिलांनी पोलीसांचे कडे तोडून कार्यालयात जावून सरपंचासमोर घागरींचा गजर केला.सरपंच व सदस्यांना कार्यालयातून बाहेर काढून कार्यालयास कुलूप लावण्याचा प्रयत्न आक्रमक महिलांनी केला.पण पोलीसांनी याला विरोध करत आंदोलक व प्रशासन यांच्यामध्ये चर्चा घडवून आणली.