आसनाखाली सापडले ‘घबाड’
ध्यानीमनी नसताना अचानक एखादी ‘मौल्यवान’ वस्तू हाताला लागली, तर होणारा आनंद अवर्णनीय असतो, असा अनेकांचा अनुभव आहे. विशेषत: अशी वस्तू ऐतिहासिक महत्वाची असेल, तशी स्थिती जणू घबाडच हाती लागल्यासारखी असते. कारण पुरातन आणि ऐतिहासिक वस्तूंना किंमत फार मोठे येऊ शकते.
ब्रिटनमध्ये नुकतीच घडलेली ही घटना आहे. या देशातील मँचेस्टर येथे एका विवाहित जोडप्याला असा अनुभव आला आहे. या दांपत्याकडे एक जुनी क्लासिक सायली कार पडून होती. अनेक दशके तिचा उपयोग केला गेला नव्हता. घराच्या गॅरेजमध्ये ती कार धूळ खात राहिली होती. काही दिवसांपूर्वी हे गॅरेज स्वच्छ करावे, अशा विचाराने या जोडप्याने हे काम हाती घेतले. त्यांनी ही कारही स्वच्छ करण्याचे ठरविले. त्याप्रमाणे कार उघडून तिची आसने स्वच्छ करीत असताना, त्यांच्या हाती एक अशी वस्तू लागली, की त्यांच्या आश्चर्याला पारावर राहिला नाही. अशी वस्तू एका गंज खाणाऱ्या कारच्या आसानाखाली सापडावी, यावर त्यांचा प्रथम विश्वासही बसला नाही. या जोडप्यातील शेरॉन टॅपसन यांनी ही माहिती सोशल मिडियावर टाकल्यामुळे ती आता बऱ्याच जणांना ज्ञात आहे.
ही वस्तू म्हणजे एक जुने मनगटी क्वार्टझ् रोलेक्स घड्याळ आहे. या घडाळ्यांची उत्पादन 1970 पर्यंत केले जात होते. सोन्याचा मुलामा असलेले हे घड्याळ आज अत्यंत दुर्मिळ मानले जाते. हे घड्याळ ‘बीटा 21 मुव्हमेंटस्’ वर आधारित असून त्याची निर्मिती रोलेक्स आणि अन्य 20 स्विस कंपन्यांनी मिळून केली आहे. आज सर्वत्र डिजिटल घड्याळांचा उपयोग केला जातो. त्यामुळे अशी क्वार्टझ् घड्याळे दुर्मिळ मानली जातात. त्यांची किंमतही खूप मोठी असते.