श्रीमंतांचा कचरा उचलून श्रीमंती
करण्याची इच्छा असेल आणि अंगी कल्पकता असेल, तर कोणतेही काम हलके किंवा कमी प्रतिष्ठेचे नसते, हे अमेरिकेतील टेक्सास येथील 30 वर्षीय महिला मॅकी मॅकगो हिने सिद्ध करुन दाखविले आहे. ही महिला श्रीमंतांचा ’कचरा’ उचलून आणि त्या कचऱ्यापासून उपयोगी वस्तू निर्माण करुन आता स्वत: श्रीमंत झाली आहे. या महिलेने स्वत:ची कल्पकता आणि काम करण्याची क्षमता, या दोन गुणांच्या जोरावर जे यश मिळविले आहे, ते इतरांसाठी आदर्श ठरणारे आहे. श्रीमंत लोकांच्या घरांमधून त्यांच्या उपयोगात नसलेल्या वस्तू आणणे आणि त्या नव्यासारख्या बनवून पुन्हा बाजारात त्यांची विक्री करणे, हा या महिलेचा व्यवसाय आहे. जुने आणि निरुपयोगी फर्निचर. भांडी,
इलेक्ट्रॉनिक साधने, अन्य तुटक्या फुटक्या वस्तू किंवा चांगल्या पण जुन्या वस्तू, ज्यांचा श्रीमंतांना कंटाळा आला आहे, अशा वस्तू हे या महिलेचे भांडवल आहे. गेली दहा वर्षे ती हा व्यवसाय करीत आहे. हा व्यवसाय तसा सोपा नाही. कारण, अशा वस्तू श्रीमंतांच्या घरातून एकत्र करणे ही अवघड बाब आहे. तसेच मिळालेल्या टाकावू वस्तू कशा स्थितीत असतील, याची कोणतीही शाश्वती नसते. अशा वस्तूंपासून पुन्हा टिकावू आणि आकर्षक वस्तू निर्माण करणे हे कौशल्याचे आणि कल्पकतेचे काम असते. हे काम ‘उच्चभ्रू’ किंवा ‘व्हाईट कॉलर्ड’ काम मानले जात नाही. तरीही या महिलेने याच कामाची निवड आपले करीअर करण्यासाठी केली. आता ती या कामात प्रवीण झाली आहे. या कामात कष्ट मोठे असले, तरी लाभाचे प्रमाणही मोठे असते. कारण, जुन्या आणि निरुपयोगी वस्तू कित्येकदा कवडीमोल दामाने मिळतात. त्यांच्यापासून नव्या आणि आकर्षक वस्तू बनविता आल्यास त्यांना मोठी किंमत मिळते. मात्र, हे कार्य वाटते तितके सोपे नाही, हे मॅकगो बाई आवर्जून स्पष्ट करतात. त्यांनी आपल्या व्यवसायाची माहिती नुकतीच सोशल मिडियावर प्रसिद्ध केली आहे. अनेकांनी ती पाहून या बाईंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. आपल्याला ‘प्रतिष्ठित’ काम मिळत नाही, म्हणून कुढणाऱ्यांसाठी आणि निराश होणाऱ्यांसाठी या बाई आदर्श ठरतील. शून्यातूनही आर्थिक समृद्धीचा स्वर्ग निर्माण करता येतो, हे त्यांनी दाखवून दिले आहे, अशी अनेकांची प्रतिक्रिया आहे.