For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निवडणूक आयोगाचीही बाजू जाणून घ्या!

06:12 AM Oct 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
निवडणूक आयोगाचीही बाजू जाणून घ्या
Advertisement

मतदार यादीत फेरफार, मतदारांची नावे वगळणे, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि आयोगाच्या निर्णयप्रक्रियेबाबत विविध आरोप केले जात आहेत. या आरोपांना उत्तर देताना भारतीय निवडणूक आयोगाने कायदेशीर तरतुदी, तांत्रिक व्यवस्था आणि प्रत्यक्ष क्षेत्रीय पडताळणीच्या आधारे आपली बाजू स्पष्ट केली आहे. आयोगाच्या म्हणण्यानुसार, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी अनेक स्तरांवर तपासणी आणि देखरेख केली जाते. मात्र आरोपांच्या फैरी झडत असताना त्याबाबत केल्या जाणाऱ्या खुलाशांकडे दुर्लक्ष होत आहे. देशातील विविध राजकीय पक्षांची मते समजून घेतलीच आहेत. पण, या बाजुकडेही एकदा समाजाने कटाक्ष टाकला पाहिजे. त्यासाठीच हा लेखन प्रपंच... तोही आयोगाने मांडलेली बाजू समजून घेतल्यानंतर मांडण्याचा केलेला प्रयत्न आहे.

Advertisement

आयोगाचे निर्णय एकतर्फी होतात का?

मुख्य निवडणूक आयुक्त इतर दोन आयुक्तांना डावलून निर्णय घेत असल्याचा आरोप आयोगाने फेटाळला आहे. आयोग ही तीन सदस्यांची घटनात्मक संस्था असून, 2023 च्या कायद्यातील कलम 18(1) नुसार कामकाजाची पद्धत ठरवली जाते. आयोगाच्या स्पष्टीकरणानुसार, निर्णय एकत्रितपणे घेतले जातात आणि पत्रे, सूचना व वैधानिक आदेश निर्धारित प्रक्रियेनुसार जारी केले जातात. मसुद्यावर चर्चा करणे, प्रश्न विचारणे किंवा सूचना देणे हा सामान्य प्रशासकीय प्रक्रियेचा भाग आहे. बैठकीपूर्वी विषयपत्रिका देणे आणि कामकाजाचे अहवाल वेळेत पूर्ण करणे हेही नियमित कामकाजाचे निकष आहेत.

Advertisement

निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबतही आयोगाने भूमिका मांडली आहे. पंतप्रधान, केंद्रीय मंत्रिमंडळातील एक मंत्री आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते यांचा समावेश असलेली निवड समिती संसदेने 2023 मध्ये कायद्याद्वारे निश्चित केली. त्यापूर्वी नियुक्त्यांमध्ये केंद्र सरकारच्या कार्यकारी प्रक्रियेची प्रमुख भूमिका होती.

ईसीआयनेटवरून मतदारांची नावे वगळली जातात का?

‘ईसीआयनेट’ या डिजिटल प्रणालीद्वारे मतदारांची नावे आपोआप वगळली जातात किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने मतदार यादी तयार केली जाते, हे आरोप आयोगाने नाकारले आहेत. मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, दुरुस्ती करणे किंवा नाव वगळणे याचे कायदेशीर अधिकार मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडे (ईआरओ) असतात. आवश्यक नोटीस आणि सुनावणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच निर्णय घेतला जातो. ईसीआयनेट हे प्रशासकीय नोंदी आणि कामकाजासाठीचे माध्यम आहे; ते स्वत:हून मतदाराची नोंद बदलत नाही.

बीएलओ, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, ईआरओ, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि मुख्य निवडणूक अधिकारी सुरक्षित लॉगिनद्वारे आपापले काम करतात. विशेष मतदार पुनरिक्षण (एसआयआर) सुरू झाल्यापासून देशभरात 109 प्रशिक्षण सत्रे झाल्याचे आयोगाने सांगितले. गोव्यातील 97 मतदारांच्या नोंदींबाबत चर्चेत आलेली घटना तांत्रिक किंवा अल्गोरिदममधील दोषामुळे नव्हे, तर स्थानिक अधिकाऱ्यांच्या मानवी चुकीमुळे घडल्याचे आयोगाचे म्हणणे आहे. घरोघरी पडताळणीनंतर पात्र मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत.

मतदार यादीची तपासणी कशी होते?

एसआयआरमध्ये बीएलओ घरोघरी जाऊन मतदारांची माहिती तपासतात. राजकीय पक्षांनी नेमलेले सुमारे 20 लाख बूथ लेव्हल एजंटही या प्रक्रियेत सहभागी असतात. मसुदा मतदार यादी आणि अनुपस्थित, स्थलांतरित, मृत तसेच दुबार नोंदींच्या प्राथमिक याद्या राजकीय पक्षांना दिल्या जातात. त्यामुळे त्यांना स्वतंत्र पडताळणी करता येते. नाव वगळण्यापूर्वी दावे-हरकतींसाठी वेळ दिला जातो आणि ईआरओच्या निर्णयाविरोधात अपील करण्याची तरतूद आहे. मतदानाच्या दिवशी संबंधित केंद्रांवर 100 टक्के वेबकास्टिंग तसेच उमेदवारांच्या पोलिंग आणि मतमोजणी एजंटमार्फत देखरेख ठेवली जाते.

तरुण मतदारांची नोंदणी आणि फॉर्म सहा

18 वर्षे पूर्ण करणाऱ्या नागरिकांना आता 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर या चार तारखांनुसार मतदार म्हणून नोंदणी करता येते. नियमित नोंदणीसाठी फॉर्म सहा कायम आहे. एसआयआरमध्ये वापरलेले अतिरिक्त घोषणापत्र विशिष्ट पडताळणीसाठी होते. या व्यवस्थेला मे 2026 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवल्याचे आयोगाने नमूद केले आहे.आयोगानुसार, 24 जून 2025 पासून 2026 च्या सुरुवातीपर्यंत 18 ते 28 वयोगटातील सुमारे 2.37 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली. म्हणजे दरमहा सुमारे 16 लाख मतदारांची भर पडली. या वयोगटातील एकूण मतदारांची संख्या 17.38 कोटी झाल्याचेही आयोगाने सांगितले.एकूणच, मतदार यादीतील त्रुटी किंवा गैरप्रकारांच्या आरोपांची तपासणी होणे आवश्यक आहे. मात्र, आरोपांबरोबरच निवडणूक आयोगाची बाजू, कायदेशीर तरतुदी, प्रत्यक्ष पडताळणी आणि उपलब्ध पुरावेही समजून घेणे महत्त्वाचे आहे. निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास टिकवण्यासाठी पारदर्शकता, स्वतंत्र तपासणी आणि जबाबदारी या तिन्ही गोष्टी आवश्यक आहेत.

विश्वास दिवेकर

Advertisement

.