उद्या ‘मॉक ड्रिल’साठी सज्जता करा!
केंद्रीय गृह विभागाची सर्व राज्यांना महत्त्वाची सूचना : सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पाकिस्तानवर निर्णायक घाव घालण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने सज्जता केली आहे, असे स्पष्ट संकेत आता मिळत असून, केंद्र सरकारच्या गृह विभागाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना एक महत्त्वाची सूचना केली आहे. या सूचनेनुसार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी उद्या बुधवारी युद्धस्थितीचे ‘मॉक ड्रिल’ करावे, असे या सूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यांवर शत्रूकडून विमानहल्ला किंवा क्षेपणास्त्र हल्ला झालाच, तर सायरन वाजवून आणि इतर मार्गांनी जनतेला अशा हल्ल्याची पूर्वसूचना देण्यासाठी सर्व राज्यांनी सज्ज रहावे. याचा सराव करण्यासाठी बुधवारी हे मॉक ड्रिल करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
हल्ला झाल्यास, नागरिकांना सुरक्षित स्थानी नेणे, अल्पावधीत ‘ब्लॅकआऊट’ करणे, राज्यांमधील महत्त्वाच्या प्रकल्पांचे संरक्षण करणे आणि अन्य आपत्कालीन यंत्रणेचा उपयोग यासाठी राज्यांनी पूर्ण सज्जता ठेवावी. जनतेच्या सुरक्षेसाठी ज्या उपाययोजना करण्यात येणार आहेत, त्यांचा सराव करावा. तसेच जनतेचे या उपायांसंदर्भात प्रबोधन करावे, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेले दोन दिवस विविध अधिकारी आणि उच्चपदस्थांसमवेत महत्त्वाच्या बैठका केल्या आहेत. सोमवारी त्यांनी देशाच्या संरक्षण विभागाचे सचिव राजेश कुमार सिंग यांच्याशी अर्धा तास चर्चा केली. रविवारी त्यांनी वायुदलाच्या प्रमुखांशीही सविस्तर चर्चा करून संरक्षण सज्जतेचा आढावा घेतला होता. सोमवारी संरक्षण सचिवांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी देशाचे प्रमुख सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशीही विस्तृत चर्चा केली होती.
राज्यांनी काय करायचे आहे...
शत्रूच्या हल्ल्यापासून स्वत:ला वाचविण्यासाठी नागरिकांनी काय केले पाहिजे. यासंबंधी त्यांचे प्रबोधन करण्याची सूचना राज्यांना देण्यात आली आहे. राज्य सरकारने नागरिकांच्या सुरक्षेसाठी जी साधने उपलब्ध केली आहेत, त्यांचा उपयोग कोणी आणि कसा करायचा यासंबंधी जनतेचे प्रबोधन राज्यांच्या प्रशासनांनी करायचे आहे. तसेच हल्ल्याची पूर्वसूचना मिळाल्यानंतर एखादा भाग किंवा वस्ती पूर्णत: रिकामी करण्याच्या दृष्टीने राज्यांनी सर्व सज्जता ठेवायची आहे. एखादा भाग किंवा वस्ती त्वरित रिकामी करण्याच्या दृष्टीने लोकांनी जे करणे आवश्यक आहे, त्याचे प्रशिक्षण लोकांना देण्याचे उत्तरदायित्व राज्यांवर सोपविण्यात आले आहे. नागरिकांनी स्वत:ची सुरक्षा करण्याच्या दृष्टीने काय केले पाहिजे, याच्या स्पष्ट सूचना स्थानिक प्रशासनाने नागरिकांना देण्याची सज्जता करावयाची आहे.
पंतप्रधान मोदी युद्धाच्या मन:स्थितीत?
पाकिस्तानला आता धडा देण्याची वेळ आली आहे, असा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे, असे दिसून येत आहे. त्यांनी गेला आठवडाभर सर्व संबंधित मंत्री, तिन्ही सेनादलांचे प्रमुख, तसेच संरक्षण आणि अन्य विभागांचे वरिष्ठ अधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा केली असून निश्चित योजना निर्धारित केली आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. ही योजना अर्थातच गुप्त असून ती केव्हा, कशी, कोठे आणि किती प्रमाणात कार्यान्वित होईल, नंतरच स्पष्ट होणार आहे. तिन्ही सेनादलांचीही सज्जता सध्या परमोच्च पातळीवर असल्याचे दिसत आहे.
‘मॉक ड्रिल’मध्ये कशाचा समावेश...
ड विमान हल्ला किंवा क्षेपणास्त्र हल्ला झाल्यास सायरन सूचनेचा सराव
ड शत्रूच्या हल्ल्यापासून स्वत:ला वाचविण्यासाठीच्या उपायांसंबंधी प्रबोधन
ड अल्पावधीत ब्लॅकआऊट किंवा संपूर्ण अंधार करण्यासंबंधीचा सराव
ड महत्त्वाचे प्रकल्प, संयंत्रे शत्रूला दिसू नयेत म्हणून करावयाचे उपाय
ड हल्ल्याच्या प्रसंगात नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी यंत्रणा