लाईट बिल कमी झालेले दाखवा ; १० हजारचे बक्षीस मिळवा
स्मार्ट वीज मीटरवरून ठाकरे शिवसेनेची योजना
कुडळ / प्रतिनिधी
अदानी स्मार्ट वीज मीटरचे बिल कमी झालेले दाखवा आणि १० हजार रु. बक्षीस मिळवा अशी बक्षिस योजना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सिंधुदुर्ग जिल्हावासियांसाठी माजी आमदार वैभव नाईक यांनी जाहिर करून पालकमंत्री व आमदार यांनी वेळ दिल्यानंतर बक्षिस वितरणाचा कार्यक्रम घेणार - असे वैभव नाईक यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरसकट अदानी कंपनीचे हजारो स्मार्ट वीज मीटर बसविण्यात आले आहेत. या स्मार्ट मिटरमुळे विजेचे अचूक बिल येणार असे भाजप महायुतीचे नेते आणि महावितरणकडून सांगण्यात येत आहे. मात्र वीज बिल पूर्वीपेक्षा तिप्पट,चौपट वाढून येत आहे. वीज ग्राहकांची परवानगी नसतानाही जबरदस्ती स्मार्ट वीज मीटर बसविले जात आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जनता मेटाकुटीस आणि आर्थिक संकटात आली असून ठिकठिकाणी वीज वितरण कार्यालयावर आंदोलन करीत आहे. मात्र तरीही जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सत्ताधारी आमदार हे याबाबत आपली भूमिका स्पष्ट करीत नाहीत. अदानी स्मार्ट वीज मीटर आणि वाढीव बिलाबाबत तोंडातून 'ब्र' सुद्धा काढत नाहीत त्यामुळे याचा निषेध म्हणून "अदानी स्मार्ट वीज मीटरचे बिल कमी झालेले दाखवा आणि १० हजार रु. बक्षीस मिळवा" हि बक्षीस योजना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राबविण्यात येत आहे. आणि या योजनेच्या बक्षीस वितरणासाठी पालकमंत्री व आमदार यांनी वेळ दिल्यानंतर पालकमंत्री व आमदार यांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेतला जाणार आहे अशी माहिती कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे. याबाबतचे फलक ठिकठिकाणी लावण्यात आले असून ग्राहकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे परवानगी शिवाच मीटर बदलण्यास कोणी आले तर त्यांना विरोध करा असे आवाहनही करण्यात आले आहे