जर्मनीचा व्हेरेव उपांत्य फेरीत
वृत्तसंस्था, माद्रिद (स्पेन)
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या माद्रिद खुल्या एटीपी मास्टर्स 1000 आंतरराष्ट्रीय पुरूषांच्या बॅडमिंटन स्पर्धेत जर्मनीच्या अॅलेक्झांडर व्हेरेवने एकेरीची उपांत्यफेरी गाठताना कोबोलीचा पराभव केला. या विजयामुळे व्हेरेवने फेडरर, नदाल, सिनर यांच्या यादीत स्थान मिळविले आहे.
उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात व्हेरेवने कोबोलीचा 6-1, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. 12 दिवसांपूर्वी झालेल्या म्युनिच खुल्या टेनिस स्पर्धेत कोबोलीने व्हेरेवला उपांत्य फेरीत पराभूत केले होते. या पराभवाची परतफेड व्हेरेवने माद्रिद स्पर्धेत केली. या स्पर्धेत व्हेरेवने चौथ्यांदा उपांत्य फेरी गाठली आहे. त्याचप्रमाणे वर्षभराच्या टेनिस हंगामात एटीपी मास्टर्स 1000 दर्जाच्या पहिल्या चार स्पर्धांमध्ये उपांत्य फेरी गाठणारा व्हेरेव हा चौथा टेनिसपटू ठरला आहे. यापूर्वी स्पेनचा राफेल नदाल, स्वीसचा रॉजर फेडरर आणि इटलीचा जेनिक सिनर यांनी असा विक्रम केला होता. आता या यादीमध्ये व्हेरेवचा समावेश झाला आहे. व्हेरेवचा उपांत्य फेरीचा सामना बेल्जियमच्या अॅलेक्झांडर ब्लॉकशी होणार आहे. ब्लॉकने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात माजी विजेत्या कास्पर रुडचा 6-4, 6-4 असा पराभव करत एटीपी मास्टर्स स्पर्धेत पहिल्यांदाच उपांत्य फेरी गाठली आहे.