जर्मनीचा गोलकीपर मॅन्युएल न्यूअर पुन्हा निवृत्त
वृत्तसंस्था, फॉक्सबरो
जर्मनीचा गोलकीपर मॅन्युएल न्यूअर याने विश्वचषकातून संघाच्या लवकर बाहेर पडण्यानंतर दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली आहे.
स्पर्धेपूर्वी निवृत्तीतून परतण्यास राजी झालेल्या 40 वर्षीय न्यूअरने टीव्ही मुलाखतींमध्ये सांगितले की, सोमवारी पॅराग्वेविरुद्ध झालेला अनपेक्षित पराभव हा त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असेल. तो यापुढे खेळणार नाही. अशा प्रकारे शेवट होणे खूप वेदनादायी आहे.
अतिरिक्त वेळेनंतरही सामना 1-1 असा बरोबरीत सुटल्याने पेनल्टी शूटआऊटमध्ये पॅराग्वेविरुद्ध 4-3 असा पराभव झाल्यामुळे जर्मनी स्पर्धेतून बाहेर पडला. न्यूअर याने यापूर्वी 2024 च्या युरोपियन चॅम्पियनशिपनंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली होती आणि आपण परतणार नाही, यावर ठाम होता. 2009 मध्ये जर्मनीसाठी पदार्पण करणारा न्यूअर हा 2014 चा विश्वचषक जिंकणाऱ्या संघातील एकमेव सक्रिय खेळाडू होता. त्याने जर्मनीसाठी 128 सामने खेळले आहेत.