जर्मनी विदेशात तैनात करणार सैन्य
दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच : युरोपमध्ये वाढतेय पुतीन यांची भीती
वृत्तसंस्था/ बर्लिन
जर्मनीने एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलत लिथुआनियामध्ये 5 हजार सैनिक तैनात केले आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच जर्मनीने विदेशी भूमीवर स्वत:चे सैनिक पाठविण्याचा निर्णय घेतल्याने याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. युक्रेनमधील युद्धानंतर रशियाचा वाढता धोका पाहता जर्मनीने हा निर्णय घेतला आहे. नाटो सहकाऱ्यांसोबत मिळून युरोपच्या पूर्व हिस्स्याची सुरक्षा मजबूत करण्याचा प्रयत्न जर्मनीने चालविला आहे.
लिथुआनियामध्ये 5 हजार सैनिकांची एक चिलखती ब्रिगेड तैनात केली जाणार आहे. जर्मनीचे सैन्य लिथुआनियामध्ये स्थायी स्वरुपात तैनात राहणार असल्याचे जर्मनीच्या सरकारकडून सांगण्यात आले. दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीने कधीच स्थायी स्वरुपात अन्य देशात स्वत:च सैन्य तैनात केले नव्हते. सुमारे 8 दशकांमध्ये पहिल्यांदाच जर्मनी स्वत:च्या सैनिकांना विदेशात तैनात करत आहे. रशियन सैन्य युक्रेनवर आक्रमण करून थांबणार नाही, तर अन्य युरोपीय देशांपर्यंत देखील पोहोचू शकते असे जर्मनीचे मानणे आहे.
का बदलली भूमिका
दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीने युद्धापासून अंतर राखण्याचे धोरण अवलंबिले होते. रशियाच्या मागील तीन वर्षांमधील आक्रमक धोरणामुळे जर्मनीला स्वत:ची भूमिका बदलावी लागली आहे. जर्मनी आता नाटोसोबत मिळून युरोपचे रक्षण करणार आहे. जर्मनीचे ब्रिगेडियर जनरल क्रिस्टोफ हूबर यांच्या नेतृत्वात लिथुआनियामध्ये युनिट तैनात करण्यात आली आहे.
लिथुआनियाची सीमा रशियाला लागू नाही, परंतु याची सीमा बेलारुसला लागून आहे. बेलारुस आणि रशिया सहकारी आहेत. लिथुआनियानजीकच रशियाचा सैन्यतळ कालिनिनग्राड आहे. अशा स्थितीत जर्मनी आणि अनेक युरोपीय देशांना लिथुआनियावर कब्जा करण्याचा प्रयत्न पुतीन करू शकतात अशी भीती वाटतेय. अशास्थितीत युरोपीय देश लिथुआनियामध्ये स्वत:चे सैनिक तैनात करत आहेत.
जर्मनीने वाढविला संरक्षण खर्च
जर्मनीने स्वत:चा सैन्य खर्च देखील वाढविला आहे. जर्मनीच्या संसदेने कर्जाच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. यामुळे जर्मनीच्या सैन्याला अधिक निधी मिळणार आहे. याचबरोबर 420 अब्ज पाउंडचा एक फंड तयार करण्यात आला आहे. या फंडद्वारे जर्मनीच्या सैन्याला आवश्यक निधी प्राप्त होत राहणार आहे. आम्हाला रशिया आणि पुतीनकडून धोका आहे. अशास्थितीत आम्ही जितक्या लवकर सज्ज होऊ तितकेच योग्य ठरेल असे उद्गार जर्मनीच्या एका वरिष्ठ सैन्याधिकाऱ्याने काढले आहेत.