जर्मनी-मर्झ यांची वादळवाट
फ्रेडरिक मर्झ यांनी स्थलांतराला विरोध करून आपली भूमिका मजबूतपणे मांडली. अँजेला मर्केल यांचे मुक्तद्वार धोरण त्यांनी सोडून दिले आणि जर्मनीच्या सुरक्षेला प्राधान्य दिले. आता त्यांना आपले सुरक्षा विषयक धोरण, परराष्ट्र धोरण, कृषी, उद्योग, संरक्षण तसेच कौटुंबिक धोरण या सर्व बाबतीत स्वत:ची धोरणे अंमलात आणावयाची आहेत. हा नेता जर्मनीची नौका राजकीय वादळातून कशी बाहेर काढतो यावरच त्यांचे भविष्य अवलंबून आहे.
कुठल्याही देशात नव्या नेत्यास अनेक वादळांना सामोरे जात वाट काढावी लागते. कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते फ्रेडरिक मर्झ यांनी जर्मनीच्या चान्सलर पदाची सूत्रे हाती घेतली आहेत. त्यांनाही आता वादळवाटेतून मार्ग काढावयाचा आहे. त्यांनी चान्सलर पदाची निवडणूक 9 मतांनी दुसऱ्या फेरीत जिंकली. त्यांच्या पक्षाला तीन मध्यम डाव्या पक्षांनी पाठिंबा दिल्यामुळे त्यांचे भाग्य उजळले. पण मर्झ यांचा मार्ग सोपा नाही. सत्तेचा काटेरी मुकुट घेऊन त्यांना जर्मनीचा कारभार पहावा लागणार आहे. आरंभीच्या काळात त्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. उजवे, डावे व पुराणमतवादी यांच्यामध्ये सुवर्णमध्य साधत ते गाडा कसा हाकतील यावर त्यांचे खरे यश अवलंबून आहे. नजीकच्या भविष्यकाळात त्यांना तप्त मोशीतून तावून-सुलाखून निघावे लागेल. पण ते मुरब्बी अनुभवी नेते असल्यामुळे सर्व वादळातून बाहेर पडतील आणि आपला कार्यकाळ पूर्ण करतील अशी अनेक राजकीय पंडितांना खात्री वाटते.
तेथील संविधानानुसार बहुमत मिळेपर्यंत फेरमतदानालाही संधी असते. दुसऱ्या फेरीच्या मतदानात मर्झ यांनी 325 मते मिळविली म्हणजे 9 मतांनी त्यांनी सरशी केली ही जमेची बाजू आहे. पण हा संकटाचा मार्ग आहे. त्यांना वाटेवर काटे वेचित चाललो असे म्हणत राजकारण करावे लागेल. मर्झ सोशल डेमोक्रॅटिक पक्षात तीन दशकापासून कार्यरत होते. एवढा दबदबा असूनही पहिल्या फेरीत त्यांना संसदेत बहुमत मिळाले नाही. एकूण 338 खासदार होते. पण पहिल्या मतदानादरम्यान 18 जणांनी असहमती दर्शवली होती. त्यामुळे पेच निर्माण झाला होता. अखेर हा पेच सोडविण्यात मर्झ यांनी मोठ्या चतुराईने मुत्सद्देगिरीने यश मिळविले. 1949 मध्ये जर्मनीमध्ये लोकशाहीचे पुनरागमन झाल्यापासून 76 वर्षात कोणत्याही एका पक्षाला बुंडेस्टॅग मध्ये यश मिळाले नाही आणि त्यामुळे अशा प्रकारच्या तडजोडीने सत्तापदे सांभाळणे आणि राजकारण करणे ही बाब अपरिहार्य बनली.
अजब मिश्रण व संयुग?
जर्मनीच्या संविधानानुसार किती मते घेतली असता सत्तापद मिळवता येते याबाबतचे गणित मोठे अद्भुत आहे. त्यांचे राजकारण हे उजव्या, डाव्या आणि मध्यम मार्गी विचारांच्या मिश्रणात आणि संयुगात सामावलेले आहे. तेथील सामाजिक, आर्थिक, औद्योगिक धोरणे अशा बहुविचारी, बहुआयामी पक्षांच्या सहमतीने कृतीमध्ये येतात आणि त्यांना एक नवी दिशाही द्यावी लागते. या निकालाचा अर्थ म्हणजे मर्झ यांनी शत्रूपक्षाचा कुटीलतेने संपूर्ण पराभव केला असे भाष्य एका जर्मन वृत्तपत्राने केले आहे आणि ते अर्थपूर्ण म्हटले पाहिजे. त्यांना सत्तेच्या राजकारणात टिकाव धरण्यासाठी तडजोड आणि किमान समान विकास कार्यक्रम यावर भर देणे आवश्यक आहे. 69 वर्षाचे मर्झ हे एक कसलेले नेते आहेत. राजकारणातील अनुभव आणि प्रशासनातील हुकमत या दोन्हींचा फायदा त्यांना होईल. राष्ट्रपती फ्रँक वॉल्टर स्टीनमेयर यांनी मर्झ यांना चान्सलर पदाची शपथ दिली आहे. तसेच त्यांच्या मंत्रिमंडळात एकूण 17 मंत्र्यांचा समावेश आहे. युरोपला मजबूत जर्मनीची गरज आहे त्यामुळे सर्व प्रकारच्या सत्ता संघर्षापासून मुक्त राहून जर्मनीचे सामर्थ्य मजबूत करणे आवश्यक आहे हा त्यांचा विश्वास सार्थ आहे. जर्मनीचे मावळते चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांच्यानंतर आता मर्झ यांच्याकडे आघाडी सरकारचे नेतृत्व आले आहे.
अल्पसा जीवनपट?
एखाद्या नेत्याच्या राजकीय कर्तृत्वाचा अभ्यास करताना त्याच्या जीवनातील चढ-उतारांचा अभ्यास करावा लागतो, असे प्राध्यापक गॉडविन म्हणतात. कारण राजकीय नेतृत्व कुठे जन्माला येते, कसे विकसित होते आणि राजकारणात उतरल्यानंतर त्या नेतृत्वाने घेतलेले निर्णय देशाच्या भविष्याला कसा आकार देतात याचा अभ्यास करावा लागतो. 1966 ते 1971 या काळात त्यांनी जिम्नॅशियम पेट्रिनम ब्रिलॉन येथे शिक्षण घेतले. शिक्षण संस्कार आणि व्यक्तिमत्त्वाची जडणघडण याचा विचार करता शालेय व महाविद्यालयीन जीवनात त्यांच्यासमोर संघर्षाची आव्हाने उभी राहिली. राजकीय पक्षाचे संघटन असो की, सामाजिक सेवेचे कार्य असो यातून त्यांनी धडे घेतले. उजव्या ख्रिश्चन राष्ट्रवादावर आधारित त्यांचे राजकारण दिवसेंदिवस प्रगल्भ होत गेले. त्यांनी राजकारणात उडी घेतली तेव्हाचा काळ हा रशियाच्या प्रभावाचा काळ होता. परंतु साम्यवादाला प्रखर विरोध करून त्यांनी जर्मनीचे सत्व आणि स्वत्व टिकविण्यासाठी संघर्ष केला. राजकीय जीवनातील चढ-उताराबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे कंगोरे अधिक उजळ होत गेले आणि त्यांनी पक्षात स्वत:चे स्थान निर्माण केले. पक्षाची युवा आघाडी असो की, सामाजिक सेवेची क्षेत्रे असोत, त्यांनी जर्मन लोकांची सेवा करण्यावर भर दिला. 1975 ते 1976 या काळात त्यांनी स्वयंचलित तोफखाना युनिटमध्ये एक सैनिक म्हणून काम केले. लष्कराचा हा अनुभव त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करण्यासाठी उपयोगी ठरला. 1976 पासून त्यांना कोनराड एडेनॉअर प्रतिष्ठानच्या शिष्यवृत्तीचा लाभ झाला. त्याआधारे त्यांनी पुढील शिक्षणाची वाटचाल केली. प्रथम बॉन आणि मारबर्ग विद्यापीठात त्यांनी कायद्याचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि ते पदवीधर झाले. या काळात ते कॅथोलिक बंधुत्व विद्यार्थी संघटनेत सक्रिय होते. त्यानंतर त्यांनी व्यवसाय व राजकारण या दोन्ही क्षेत्रात मोठी उडी घेतली. 1986 ते 1989 या कालखंडामध्ये त्यांनी बॉन आणि फ्रँकफर्ट येथील जर्मन केमिकल इंडस्ट्रीमध्ये कायदेशीर सल्लागार म्हणून काम केले व मोठा लौकिक मिळविला.
राजकारणातील चढउतारांचा विचार करता असे दिसते की, पक्षाच्या युवा आघाडीत प्रवेश करून ते पुढे प्रत्यक्ष राजकारणात सक्रिय झाले. 1989 ते 1994 या काळात त्यांनी युरोपियन संसदेत प्रवेश केला आणि ज्वलंत प्रश्न बुलंदपणे मांडून जर्मनीचे प्रभावीपणे प्रतिनिधित्व केले. हा त्यांच्या राजकारणातील आणखी एक यशाच्या चढत्या आलेखाचा बिंदू होता. या काळात त्यांनी युरोपियन युनियनच्या आर्थिक व चलनविषयक समितीचे सदस्य म्हणून चांगले काम बजावले आणि आपल्या कामाचा ठसा उमटविला. पुढे त्यांनी जर्मन संसदेत प्रवेश करून तेथेही आणखी नावलौकिक मिळविला. 1994 ते 2009 हा त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा काळ होता. बुंडेस्टॅगवर त्यांच्या संसदीय कामकाजावर प्रभाव टाकला आणि ते देशाला एक कुशल संसदपटू म्हणून परिचित झाले. पहिल्या कार्यकाळात ते वित्त समितीचे सदस्य बनले आणि त्यांनी जर्मन अर्थकारणाची घडी बसविण्याचा प्रयत्न केला. 1998 मध्ये ते प्रथम आपल्या पक्षाच्या संसदीय गटाचे उपाध्यक्ष बनले आणि 2000 मध्ये ते अध्यक्ष बनले. संसदेमध्ये चान्सलर गेरहार्ड श्रोडर यांच्या काळात त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून उत्तम कामगिरी बजावली. 2002 साली एडमंड स्टोइबर यांनी त्यांची
शॅडो कॅबिनेटमध्ये निवड केली आणि त्यांच्या कुशल प्रशासन चातुर्याची जर्मनीला ओळख होऊ लागली. या कालखंडात त्यांनी आपल्या कामाची पद्धती व जनसंपर्क यामध्ये सुधारणा करून एक पाऊल पुढे टाकले. अँजेला मर्केल यांच्या काळात त्यांनी पुन्हा एकदा उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले. 2002 ते 2004 या काळात त्यांनी सीडीयूच्या कार्यकारणीचे सदस्य म्हणून कार्य बजावले. 2005 मध्ये ते अँडियन कराराचा ध्रुवतारा म्हणून उदयास आले आणि त्यांनी कायदेशीर समितीचे सदस्य म्हणून कार्य केले. पक्षांमध्ये मूलभूत निष्ठांची भक्कम बैठक प्रस्थापित करून त्यांनी स्वत:चा एक अंतर्गत गट तयार केला व तो त्यांच्या शक्तीचे केंद्रस्थान बनला. 2009 च्या निवडणुकीत आपण उभे राहणार नाही असा पवित्रा घेऊन त्यांनी आपल्याभोवती वलय तयार केले. 2004 मध्ये राजकारण सोडल्यानंतर त्यांनी कार्पोरेट क्षेत्रात वकील म्हणून काम करण्यास सुरुवात केली आणि या काळात 14 पेक्षा अधिक कार्पोरेट उद्योगांशी त्यांनी सल्ला मसलती करून मार्गदर्शन केले. 2018 मध्ये अँजेला मर्केल यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतला तेव्हा मर्झ यांनी ही राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी संन्यास सोडला व पुन्हा राजकारणात प्रवेश केला. पण 2018 मध्ये त्यांनी पक्ष नेतृत्वाची लढाई गमावली आणि ते पराभूत झाले. परंतु त्यांनी आपला आत्मविश्वास गमावला नाही.
विशेषत: कोरोना महामारीच्या काळात त्यांचे सेवाकार्य प्रभावी ठरले. संघीय राजकारणात आपण परस्पर सहकार्याने एकत्रपणे काम केल्यास पक्ष मजबूत होऊ शकतो हे त्यांचे धोरण इतरांनाही पटले व त्यांचे नेतृत्व पुढे वाटचाल करू लागले. 12 वर्षांच्या अनुपस्थितीनंतर मर्झ पुन्हा बुंडेस्टॅगमध्ये परतले. त्यांचा राजकीय वनवास संपला आणि त्यांच्या अभ्युदयाचा काळ सुरू झाला. 2022 मध्ये ते पक्षाच्या अध्यक्षपदी पुन्हा निवडले गेले आणि त्यांचे कर्तृत्व अधिक तेजस्वी बनले. तिसऱ्या फेरीत सर्वाधिक लोकप्रियता मिळवून ते पक्षाच्या अध्यक्षपदी विराजमान झाले आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांनी त्रिपक्षीय युती करून ब्लॅक-रेड आघाडीची मुहूर्तमेढ रोवली व नवे समीकरण मांडले. 6 मे रोजी झालेल्या मतदानात चमत्कार झाला, हारता हारता पुन्हा जिंकले आणि थेट चान्सलरपदी विराजमान झाले.
प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर