For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फ्रान्सला हरवून जर्मनी उपांत्य फेरीत

06:41 AM Dec 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
फ्रान्सला हरवून जर्मनी उपांत्य फेरीत
Advertisement

► वृत्तसंस्था / चेन्नई

Advertisement

आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या कनिष्ठ पुरूषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या अटीतटीच्या सामन्यात विद्यमान विजेत्या जर्मनीने फ्रान्सचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 3-1 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला.

जर्मनीच्या कनिष्ठ पुरूष हॉकी संघाने या स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत आपली मक्तेदारी राखली असून सातवेळा या स्पर्धेचे जेतेपद मिळविले आहे. 2023 साली झालेल्या या स्पर्धेचे अजिंक्यपद जर्मनीने मिळविले होते. शुक्रवारचा सामना चुरशीचा झाला आणि निर्धारीत वेळेत दोन्ही संघ 2-2 असे बरोबरीत राहिल्याने पंचांनी पेनल्टी शूटआऊटचा अवलंब केला.

Advertisement

या सामन्यात निर्धारीत वेळेत दोन्ही संघांचा खेळ आकर्षक आणि दर्जेदार झाला. 13 व्या मिनिटाला फ्रान्सला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि जर्मनीच्या गोलरक्षकाने भक्कम गोलरक्षण करुन फ्रान्सला खाते उघडण्याची संधी दिली नाही. सामन्यातील पहिल्या सत्रात गोलकोंडी कायमच राहिली. या सामन्यातील दुसऱ्या सत्रात दोन्ही संघांचा खेळाचा दर्जा अधिकच वाढला. 23 व्या मिनिटाला फ्रान्सला मिळालेला दुसरा पेनल्टी कॉर्नर वाया गेला. दरम्यान जर्मनीलाही गोल करण्याची संधी मिळाली होती. पण ती वाया गेली. 30 व्या मिनिटाला अॅलेक स्किव्हेरेनने मैदानी गोल करुन जर्मनीचे खाते उघडले. मध्यंतरापर्यंत जर्मनीने फ्रान्सवर 1-0 अशी आघाडी मिळविली होती. सामन्यातील तिसऱ्या सत्राला प्रारंभ झाल्यानंतर फ्रान्सला या सामन्यातील तिसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि त्यांच्या मॅलो मार्टिनेकने अचूक गोल करत आपल्या संघाला जर्मनीशी बराब्sारी साधून दिली. 36 व्या मिनिटाला जर्मनीला पेनल्टी कॉर्नर्स मिळाला आणि त्यांच्या पॉल ग्लेंडरने आपल्या संघाचा दुसरा गोल केला. 55 व्या मिनिटाला हुगो डोलोयुने मैदानी गोल करुन फ्रान्सला या सामन्यात 2-2 अशी बरोबरी साधून दिली.

निर्धारीत वेळेत गोलकोंडी कायम राहिल्याने पंचांनी पेनल्टी शूटआऊटचा अवलंब केला. जर्मनीतर्फे जोनास व्हॉन जेरुसम, जस्टेस वेरव्हेग, लुकास, कोसील यांनी गोल नोंदविले तर फ्रान्सतर्फे मिचालिसने एकमेव गोल केला. 2023 साली झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात जर्मनीने फ्रान्सचा 2-1 असा पराभव करुन जेतेपद पटकाविले होते.

स्पेनची आगेकूच

शुक्रवारी या स्पर्धेतील खेळविण्यात आलेल्या पहिल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात स्पेनने कडव्या न्यूझीलंडचे आव्हान 4-3 असे संपुष्टात आणत उपांत्यफेरीत प्रवेश मिळविला. पहिल्या सत्रातच स्पेनने न्यूझीलंडवर 3-0 अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या मिनिटाला निकोलास मुष्टारोसने, दहाव्या मिनिटाला जोसेफ मार्टिनने तर 12 व्या मिनिटाला अल्बर्ट सेराहिमाने गोल केले. त्यानंतर न्यूझीलंडने पिछाडीवरुन चांगलीच मुसंडी मारत तीन गोल नोंदविले. सॅम लिंट्सने 22 व्या आणि 60 व्या मिनिटाला असे दोन मैदानी गोल तर रियान पेरने पेनल्टी कॉर्नरवर न्यूझीलंडचा तिसरा गोल केला. सामन्यातील काही सेकंद बाकी असताना अॅव्हेलाने पेनल्टी कॉर्नरवर स्पेनचा चौथा आणि निर्णायक गोल नोंदवून न्यूझीलंडचे आव्हान संपुष्टात आणले.

Advertisement
Tags :

.