कॅनडाला हरवून जर्मनी उपांत्य फेरीत
वृत्तसंस्था/मालेगा (स्पेन)
डेव्हीस चषक टेनिस स्पर्धेतील येथे खेळविण्यात आलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत जर्मनीने कॅनडाचा 2-0 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. या विजयामुळे जर्मनी डेव्हिस संघाला तब्बल तीन दशकानंतर पहिल्यांदा डेव्हिस जिंकण्याची संधी उपलब्ध झाली आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीतील दुसऱ्या एकेरी सामन्यात जर्मनीच्या जेन लिनार्ड स्ट्रफने कॅनडाच्या डेनिस शेपोव्हॅलोव्हचा 4-6, 7-5, 7-6 (7-5) असा पराभव केला. तत्पूर्वी पहिल्या एकेरी सामन्यात डॅनियल अल्टमेअरने कॅनडाच्या डायलोचा 7-6 (7-5), (6-4) असा पराभव केला. आता शुक्रवारी जर्मनी आणि नेदरलॅन्डस् यांच्यात उपांत्य फेरीची लढत होणार आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेतील अन्य एका उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत हॉलंडने स्पेनवर 2-1 अशी मात केली. स्पेनच्या अनुभवी आणि माजी टॉपसिडेड राफेल नदालने बुधवारी आंतरराष्ट्रीय टेनिस क्षेत्रातून निवृत्तीचा निर्णय घेतला. जर्मनीने 2021 साली या स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला होता. 1993 साली जर्मनीने डेव्हिस चषकावर आपले नाव कोरले होते. तर 2022 साली कॅनडा डेव्हिस चषकाचा मानकरी ठरला होता.