जर्मनीच्या बीएमझेड शिष्टमंडळाकडून केएसआरटीसीच्या उपक्रमांची प्रशंसा
बेंगळूर : जर्मन सरकारच्या फेडरल सचिवालयातील इकॉनॉमिक को-ऑपरेशन अॅण्ड डेव्हलपमेंट (बीएमझेड)च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने मंगळवारी कर्नाटक राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या (केएसआरटीसी) कार्यालयाला भेट दिली. सदर शिष्टमंडळ भारत दौऱ्यावर आले आहे. दौऱ्याचा एक भाग म्हणून त्यांनी केएसआरटीसीच्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. दृष्टीदोष असणाऱ्या प्रवाशांकडून सार्वजनिक परिवहनचा वापर वाढावा, या उद्देशाने उपयुक्त साऊंड नेव्हिगेशन यंत्रणा असलेल्या ‘ध्वनी स्पंदन-ऑनबोर्ड’ विषयी शिष्टमंडळातील सदस्यांनी माहिती घेतली.
दरम्यान, केएसआरटीसीचे व्यवस्थापकीय संचालक अक्रम पाशा यांनी ध्वनी स्पंदनविषयी शिष्टमंडळाला विस्तृत माहिती दिली. तसेच भारत सरकारकडून मिळालेले पुरस्कार दाखविले. शिष्टमंडळात जर्मनीच्या इकॉनॉमिक को-ऑपरेशन अॅण्ड डेव्हलपमेंटच्या मुख्य संचालक क्रिस्टिन तोट्झ्पे, बार्बरा शेफर आणि क्रिस्तोफ वॉन स्टेकोव्ह यांचा समावेश होता. राईज्ड लाइन्स फौंडशनने विकसित केलेल्या आणि जीआयझेडच्या ग्रीन अर्बन मोबिलिटी इनोव्हेशनच्या नेतृत्वाखाली विस्तारित केलेल्या ऑनबोर्ड सिस्टमच्या अंमलबजावणीही माहितीही शिष्टमंडळाला देण्यात आली. दौऱ्यावेळी बीएमझेड शिष्टमंडळाने म्हैसूर शहरातील बसेसमधून संचार केला.