जंटलमनांचा ‘गेम’
क्रिकेटला ‘सभ्य लोकांचा’-जंटलमनांचा खेळ म्हणून ओळखले जाते, कारण त्यात शिस्त, सौजन्य आणि खेळभावनेची जोपासना होते. मात्र, एशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारत-पाकिस्तान लढतीने या खेळाच्या शुद्ध स्वरूपाला कूटनीतीच्या कठोर सावलीने ग्रासले. भारताने पाकिस्तानला पाच विकेट्सने पराभूत करून नवव्यांदा ट्रॉफी जिंकली, याचा भारतीय म्हणून आनंद आणि अभिमानच. परंतु भारतीय संघाने एशियन क्रिकेट कौन्सिल (एसीसी) चे प्रमुख आणि पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयाची तुलना ‘ऑपरेशन सिंदूर’शी करणारे ट्विट केले, ज्याने सामन्याला राजकीय रंग चढला. या घटनेने क्रिकेटच्या मैदानावर कूटनीतीचे स्वरूप आणि भारत-पाकिस्तान सामने खेळणे तसेच पुढील स्पर्धा रंगवणे गरजेचे आहे का, यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले. तटस्थ दृष्टिकोनातून हा विषय तपासणे महत्त्वाचे आहे, कारण यात क्रिकेटच्या शुद्धतेबरोबरच क्रीडा, कूटनीती आणि राष्ट्रवाद यांचे जटिल नाते गुंतलेले आहे. या स्पर्धा खेळल्या नाही तर बिघडणार कोणाचे आहे? याचे उत्तर बीसीसीआयने दिले पाहिजे. त्यांना सामने न ठेवल्यास आशियाई क्रिकेटचे नुकसान होईल असे वाटते त्या दबावापोटी ते संघ खेळवतात. ग्रामीण भारतात कोंबडे झुंजवण्याचा एक खेळ खेळला जातो. दुबईच्या बादशहाच्या दारात भारतीय आणि पाकिस्तानी खेळाडूंना झुंजवणे म्हणजे याहून वेगळे काय आहे? याचा विचार देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाने करण्याची आणि जोपर्यंत खरोखरच संबंध सुधारत नाहीत तोपर्यंत अशा लुटुपुटूच्या लढाया जिंकण्यात आनंद मानण्यापेक्षा हे सामने रोखण्याची गरज आहे. एशिया कप 2025 चा अंतिम सामना हा केवळ क्रिकेटचा सामना नव्हता, तर भारत-पाकिस्तानमधील राजकीय तणावाचा एक आलेख होता. एप्रिल 2025 मध्ये पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले. प्रत्युत्तरादाखल भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले. या पार्श्वभूमीवर, नकवी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास भारताने नकार दिला आहे. बीसीसीआयचे सचिव देवजित सायकीया यांनी स्पष्ट केले की, ‘ज्या व्यक्तीने देशाविरुद्ध युद्ध छेडले आहे, त्यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारता येणार नाही.’ ही विधाने नकवींच्या पाकिस्तानी गृहमंत्री म्हणून भूमिकेशी जोडली गेली, ज्यात ते दहशतवादविरोधी धोरणांचे प्रमुख आहेत. त्यांच्यासह पाकिस्तानी खेळाडूंचे सामन्यांदरम्यानचे वर्तन देखील आक्षेपार्हच होते. त्याला भारतीय संघाकडूनही चोख प्रत्युत्तर दिले गेले. दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला 146 धावांवर रोखले आणि तिलक वर्माच्या नाबाद 69 धावांच्या जोरावर विजय मिळवला. मात्र,
ट्रॉफी वितरण समारंभात भारतीय खेळाडूंनी नकवींशी स्टेज शेअर करण्यास नकार दिला आणि दुबई क्रिकेट बोर्डाच्या उपाध्यक्षाकडून ट्रॉफी घेतली. अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांनी वैयक्तिक पुरस्कार घेतले, पण संघाने सामूहिक ट्रॉफी नाकारली. पंतप्रधान मोदींच्या ट्विटने, ‘ऑपरेशन सिंदूर ऑन द गेम्स फील्ड. आउटकम इज द सेम-इंडिया विन्स!’ असे म्हणत, विजयाला सैन्यकारवाईशी जोडले. हे ट्विट व्हायरल झाले आणि भारतात उत्साह निर्माण झाला. या सगळ्या वादात दोन्ही देशांकडून क्रिकेटला फक्त राजकीय हत्यार बनवले गेले. त्याचा परिणाम काय? या खेळातून साधले काय? एका अर्थाने खेळाडूंच्या मेहनतीला निवडणुकीच्या राजकारणाचे गालबोट लागले. भारत-पाकिस्तान सामने खेळणे गरजेचे होते का? हा प्रश्न दोन्ही देशांमधील तणावाच्या इतिहासातून उद्भवतो. 1947 च्या फाळणीनंतर आणि 1965, 1971, 1999 च्या युद्धांनंतर क्रिकेट हे संवादाचे एकमेव सॉफ्ट पॉवर राहिले आहे असे या समर्थनार्थ वारंवार सांगितले जाते. अर्थात म्हणून दोन देशातले वैर संपलेले नाही की शेजारधर्म पाळलेला नाही. पण, अलीकडे समर्थन करताना 2011 च्या विश्वचषकात जेव्हा तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि युसूफ रझा गिलानी यांनी एकत्र सामना पाहिला तेव्हा भारत-पाकिस्तान सामन्याने शांततेचा संदेश दिला, असे सांगितले जाते. पण, सध्या कॉंग्रेसनेही याला विरोध दर्शवला आहे. अगदी सहा महिने आधी झालेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर 2025 मध्ये तणाव वाढला, आणि भारताने द्विपक्षीय मालिका बंद केल्या. तरीही एक समर्थन असे केले जाते की, एशिया कपसारख्या बहुपक्षीय स्पर्धांमुळे सामने खेळणे अपरिहार्य ठरते, कारण भारत आणि पाकिस्तान एसीसीचे सदस्य आहेत. या स्पर्धेत भारताने पाकिस्तानला ग्रुप स्टेज आणि सुपर फोरमध्येही पराभूत केले, आणि अंतिम सामन्यात तिसऱ्यांदा विजय मिळवला. म्हणजे खेळायचे आहे असे ठरवून सरकारने निर्णय घ्यायचा म्हटला तर बीसीसीआयचे म्हणणे पुढे करून खेळ खेळता येतो. पाहिजे तेव्हा ट्रॉफी नाकारताही येते. या सामन्यांचे औचित्य दोन दृष्टिकोनांतून पाहता येते. पहिला, क्रिकेट त्या त्या देशातील सामान्य लोकांना एकत्र आणते. भारतात तिलक वर्मा, रिंकू सिंग, जसप्रित बुमराह आणि पाकिस्तानात बाबर आझम, शाहीन आफ्रिदी यांच्या खेळाने त्या त्या देशातील चाहत्यांना आनंद मिळतो. दुसरा, राजकीय तणावामुळे असे सामने राष्ट्रवादी उन्मादाला खतपाणी घालतात. म्हणजे कोंबड्याच्या झुंजीहून या जंटलमन मंडळींच्या खेळाला आपण वेगळे समजत नाही. कोंबड्यांच्या जागी जिवंत माणसांची झुंज पाहण्यात लोकांना मजा आली पाहिजे अशी आपली भूमिका दिसते. क्रिकेट हा सांस्कृतिक पूल आहे, जो तणाव कमी करू शकतो वगैरे सगळे झूट. त्याचा राजकीय फायदा मिळतो का याची संधी तपासणे सर्वांच्याच हिताचे ठरत असावे त्यासाठी सामन्यांचा जुगार लावला जातो असे म्हटल्यास चुकीचे ठरेल का?