सज्जनांना नम्रतेने विनंती केल्यावर आत्मज्ञान मिळते
अध्याय तिसरा
बाप्पा म्हणाले, हे राजा, सर्व यज्ञांमध्ये ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. या आधीच्या श्लोकात कायिक, वाचिक आणि मानसिक असे तीन प्रकारचे यज्ञ तुला सांगितले. या यज्ञांमुळे चित्तशुद्धी होत राहते. अशाप्रकारे चित्त शुद्ध होऊन परिस्थितीचा स्वीकार करायची तयारी झाली की, मनुष्य कायिक, वाचिक आणि मानसिक तप करू लागतो. ह्या सर्व पूर्वाभ्यासामुळे सर्व यज्ञात श्रेष्ठ असा ज्ञानयज्ञ करायची पात्रता त्याच्यात येते. हे मोक्ष मिळवण्याचे साधन असून ते आत्मसात केले असता सर्व कर्मांचा त्यात लय होतो. म्हणजेच केलेल्या कर्मापासून तयार झालेले पाप पुण्य त्यात जिरून जाते. त्यामुळे जन्ममरणाच्या चक्रातून त्याची सुटका होते.
सद्गुरु अष्टावक्र मुनी म्हणतात, आत्मज्ञान म्हणजे पूर्वप्रारब्धानुसार प्राप्त झालेल्या परिस्थितीचा सहजतेनं स्वीकार करायला शिकणे ही सर्व ईश्वरी लीला असून मनुष्याच्या भल्यासाठी त्यातील घटना, व्यक्ती व परिस्थिती यांची योजना त्याच्याकडूनच झालेली आहे अशी पक्की धारणा होणे. एकूणच सर्व आयुष्य कर्मसिद्धांतानुसार चाललं असून त्याबद्दल कोणतीही कुरकुर न करता जगत राहिल्यास शेवटी मनुष्याचे जुने पाप संपूर्णपणे नष्ट होणार असून, नवीन प्रारब्ध तयार होणार नाही याची खात्री होणे. याजन्मी ईश्वराने हातात ठेवलेली गोष्ट म्हणजे कितीही विपरीत परिस्थिती आली तरी नीती धर्माच्या चौकटीत राहून वागण्याचे स्वातंत्र्य प्राणपणाने सांभाळणे व त्यानुसार आयुष्य तडीस नेणे.
आता हे आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी सज्जनांना नम्रतेने त्याविषयी प्रश्न विचारावा असे बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत.
तज्ञेयं पुरुषव्याघ्र प्रश्नेन नतित सताम् ।
शुश्रूषया वदिष्यन्ति संतस्तत्त्वविशारदा ।। 40।।
अर्थ- हे पुरुषश्रेष्ठा, सज्जनांना प्रश्न करून आणि नम्रता धरून ते ज्ञान प्राप्त करावयाचे असते. हे ज्ञान जाणण्याची खरी इच्छा असली की, तत्त्वविशारद सज्जन त्याबद्दल सांगतात.
विवरण- बहुतेकांची मला सर्व कळतंय मग मी इतरांना कशाला विचारत बसू अशी धारणा असते पण कुठल्याही महत्त्वाच्या गोष्टीबाबत कुणाकडून तरी ऐकून वा वाचून काही समजले तरी ते प्रत्यक्षात आणण्यात येणाऱ्या अडचणी त्या त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तीच सांगू शकतात. इथं तर आत्मज्ञानाविषयी जाणून घ्यायचंय. आत्मज्ञान म्हणजे काय याबद्दल माहिती आपण मागील श्लोकात घेतली पण ते मिळवणं आणि पचनी पडून अमलात आणणं हे बिलकुल सोपं नसतं. म्हणून बाप्पा म्हणतात, सज्जनांना, सद्गुरूंना विनयानं शरण जावे, त्यांचे शिष्यत्व पत्करावे, त्यांची सेवा करावी. सेवा म्हणजे त्यांची शारीरिक सेवा नव्हे तर त्यांच्या चरणी अनन्य भावाने शरण जावे. त्यांच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करावे म्हणजे शिष्याचे अस्तित्व त्यांच्यात विरघळून जाते.
ह्याप्रमाणे त्यांच्याशी अद्वैत साधल्यावर त्यांना आत्मज्ञानाविषयी प्रश्न विचारावेत. तुमची श्रद्धा पाहून सद्गुरु तुमच्यावर कृपा करून मार्गदर्शन करतात. शिष्य आत्मज्ञान मिळवण्यास पात्र झाल्यावर ते त्याच्यात प्रकट होते. आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर तो करत असलेल्या कर्मातून पापपुण्याची निर्मिती होत नसल्याने ते कर्म निर्दोष होते. तसेच पूर्वीच्या ज्या कर्माचे फळ भोगण्याची वेळ अजून आलेली नसते ते संचित आत्मज्ञानाच्या धगीत जाळून नष्ट होते. अशा प्रकारे त्यांची सर्व कर्मे आत्मज्ञानात लय पावतात. ह्याजन्मी त्याचे जे भोग भोगायचे राहिलेले असतात ते भोगल्यावर त्याची जन्ममरणाच्या चक्रातून सुटका होते.
क्रमश: