मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकरांसह ११ जण निर्दोष! भरणे जगबुडी पुलाला दोन अधिकाऱ्यांना बांधल्याचे प्रकरण
अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल दीड महिना तुरुंगवासही भोगला
खेड / प्रतिनिधी
भरणे येथील नव्या जगबुडी पुलाचा भराव खचल्यानंतर केलेल्या आंदोलनादरम्यान घटनास्थळी दाखल झालेल्या राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या दोन अधिकाऱ्यांना पुलाला बांधल्याच्या प्रकरणातून मनसेचे राज्य सरचिटणीस अँड. वैभव खेडेकर यांच्यासह ११ जणांची सोमवारी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात वैभव खेडेकर यांना तब्बल दीड महिने तुरुंगवास भोगावा लागला होता. त्यांच्या वतीने अँड. अश्विन भोसले, अँड. सिद्धी खेडेकर यांनी काम पाहिले.
जुलै २०१९ मध्ये भरणे येथील नव्या जगबुडी पुलाचा भराव खचल्यानंतर पुलाचे काम निष्कृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करत मनसे व राष्ट्रवादीने १ तास महामार्ग रोखून धरला होता. वैभव खेडेकर यांच्या आक्रमकतेनंतर घटनास्थळी दाखल झालेल्या राष्ट्रीय महामार्ग खात्याचे कार्यकारी अभियंता आर. के. बामणे, उपविभागीय अभियंता प्रकाश गायकवाड यांना धारेवर धरले होते. अँड. वैभव खेडेकर यांच्यासह मनसेच्या अन्य कार्यकर्त्यांनी दोन्ही अधिकाऱ्यांना पुलाला दोरीच्या सहाय्याने बांधण्याचा प्रयत्न केला होता.
याबाबत उपविभागीय अभियंता प्रकाश गायकवाड यांनी येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केल्यानंतर अँड. वैभव खेडेकर, रहिम सहीबोले, सागर कवळे, सुनील चिले, राजेश कदम, शाम मोरे, प्रमोद दाभिळकर, राजेंद्र खेडेकर यांच्यासह अन्य तिघांवर अटकेची कारवाई करण्यात आली होती. वैभव खेडेकर यांना दोनवेळा पोलीस कोठडी सुनावल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती.
अँड. वैभव खेडेकर तब्बल दीड महिने तुरूंगातच होते. त्यानंतर त्यांना जामीन मंजूर झाला होता. याप्रकरणाची सोमवारी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयासमोर सुनावणी झाली असता अँड. भोसले व अँड. खेडेकर यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने अँड. वैभव खेडेकर यांच्यासह अन्य ११ जणांची निर्दोष मुक्तता केली. या निकालानंतर अँड. वैभव खेडेकर यांनी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाच्या निर्णयाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.