For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जनरल मिन आंग ह्लाइंग म्यानमारचे नवे राष्ट्रपती

06:34 AM Apr 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
जनरल मिन आंग ह्लाइंग म्यानमारचे नवे राष्ट्रपती
Advertisement

5 वर्षांपूर्वी करविला होता देशात सत्तापालट : संसदेत मिळविले बहुमत : स्वत:च्या निष्ठावंताची सैन्यप्रमुखपदी नियुक्ती

Advertisement

वृत्तसंस्था/ नेपीडॉ

म्यानमारच्या सैन्य राजवटीने लोकशाहीच्या मुखवट्यामागील स्वत:च्या शक्तीला आणखी अधिक औपचारिक स्वरुप दिले आहे. 2021 मध्ये निवडणुकीच्या माध्यमातून आलेल्या सरकारला हटविणारे वरिष्ठ जनरल मिन आंग ह्लाइंग आता अधिकृत स्वरुपात म्यानमारचे राष्ट्रपती झाले आहेत. सैन्य समर्थनप्राप्त संसदेत शुक्रवारी झालेल्या मतदानात त्यांनी बहुमताचा आकडा पार केला, यामुळे देशाची धुरा आता पूर्णपणे त्यांच्या हातात आली आहे.

Advertisement

69 वर्षीय मिन आंग ह्लाइंग यांना संसदेत एकूण 584 मतांपैकी कमीतकमी 293 मते मिळाली. म्यानमारच्या वर्तमान संसदेत सैन्याचा दबदबा असल्याने त्यांचा हा विजय पूर्वीपासून निश्चित मानला जात होता. म्यानमारच्या घटनेनुसार संसदेच्या एक चतुर्थांश जागा कुठल्याही निवडणुकीशिवाय थेट सैन्याधिकाऱ्यांसाठी राखीव असतात, ज्यामुळे कुठल्याही राजकीय पक्षासाठी सैन्याच्या मर्जीशिवाय सरकार स्थापन करणे जवळपास अशक्य आहे.

सत्तापालट ते राष्ट्रपती भवनापर्यंतचा प्रवास

फेब्रुवारी 2021 मध्ये नोबेल पुरस्कार विजेत्या आंग सान सू की यांच्या लोकशाहीवादी सरकारला हटवून जनरल ह्लाइंग यांनी सत्ता हातात घेतली होती. तेव्हापासून म्यानमार गृहयुद्धात होरपळत आहे. अलिकडेच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये सैन्य समर्थनप्राप्त ‘युनियन सॉलिडेरिटी अँड डेव्हलपमेंट पार्टी’ने (युएसडीपी) 80 टक्क्यांहून अधिक जागांवर विजय मिळविला होता. परंतु आंतरराष्ट्रीय पर्यवेक्षक आणि पाश्चिमात्य देशांनी या निवडणुकीला ढोंग ठरविले आहे.

मोठे फेरबदल

-राष्ट्रपती होण्यापूर्वी ह्लाइंग यांनी सैन्यात मोठे फेरबद केले, स्वत:चे निष्ठावंत अन् माजी गुप्तचर प्रमुख ये विन यांना सैन्यप्रमुख नियुक्त केले.

-जनरल ह्लाइंग यांचे हे पाऊल आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:चे सरकार वैध दाखविण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जातेय.

-राष्ट्रपती म्हणून ह्लाइंग हे शेजारी देश आणि जागतिक संघटनांसोबत चांगले संबंध निर्माण करण्याची अपेक्षा बाळगून आहेत.

-तेथे हे केवळ सत्ताकेंद्र बदलण्यासारखे आहे, कारण सैन्य मागील 6 दशकांपैकी 5 दशकांपर्यंत थेटपणे देश चालवत राहिला आहे.

गृहयुद्धाचे नवे आव्हान

जनरल ह्लाइंग यांनी राजधानी नेपीडॉमध्ये स्वत:ची सत्ता औपचारिक केली असली तरी देशाच्या मोठ्या हिस्स्यात अद्याप युद्ध सुरू आहे. चालू आठवड्यातच आंग सान सू की यांचा पक्ष आणि वांशिक अल्पसंख्याक समुहांनी मिळून एक नवी संयुक्त आघाडी निर्माण केली आहे. या नव्या आघाडीने सैन्य हुकुमशाहीसमवेत सर्वप्रकारच्या हुकुमशाहीला पूर्णपणे नष्ट करणे आणि एक नवा राजकीय पर्याय उपलब्ध करणे उद्देश असल्याचे वक्तव्य जारी करत म्हटले आहे. म्यानमारचे शेजारी देश (चीन अन् आसियान देश) आता ह्लाइंग यांच्या नव्या सरकारसोबत संबंध मजबूत करण्याचा प्रयत्न करू शकतात, ज्यामुळे बंडखोर गटांवरील सैन्यदबाव आणखी वाढू शकतो. परंतु देशांतर्गत सशस्त्र संघर्ष आणि आर्थिक बिकट स्थिती ह्लाइंग यांच्या राष्ट्रपती कार्यकाळासाठी मोठे आव्हान असेल.

Advertisement
Tags :

.