पुणे येथे 24 डिसेंबर रोजी सुतार समाजाचा महामेळावा
मुख्यमंत्र्यांची उपस्थिती ; समाज बंधू- भगिनींना उपस्थित राहण्याचे जिल्हा समन्वयकांचे आवाहन
आचरा प्रतिनिधी
सुतार समाजाच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक मागण्यांच्या पुर्ततेसाठी आणि समाजाच्या आर्थिक उन्नती आणि विकासासाठी पुणे देवाची आळंदी येथे 24डिसेंबर रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत सुतार समाजाचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे .तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व समाज बंधू भगिनींनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा विश्वकर्मीय सुतार समाज समन्वयक प्रकाश मेस्त्री यांनी केले आहे.
पुणे जिल्ह्यातील देवाची आळंदी येथील 332 प्रदक्षिणा रोड फुटवाले धर्मशाळा येथे सुतार समाजाचा हा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या महामेळाव्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्राम विकासमंत्री तसेच धुळे जिल्हा पालकमंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे उद्योग मंत्री उदय सामंत तसेच समाजाचे आमदार संजय रायमुलकर उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात उद्योजक, तज्ञ मार्गदर्शकांकडून समाज बांधवांच्या आर्थिक उन्नतीसाठी मार्गदर्शन करणार असल्याचे प्रकाश मेस्त्री यांनी सांगितले. तरीया महामेळाव्यास राज्यातील प्रत्येक घरातून सुतार समाज बंधू भगिनींनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय समाज समन्वयक समितीचे विभाग समन्वयक आनंद मेस्त्री, सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक प्रकाश मेस्त्री, समन्वय समिती सचिव राजू मेस्त्री यांनी केले आहे.