65 वर्षात प्रथमच तीन वर्ष महासभेला ‘ब्रेक’ सभागृह शांत, नगरसेवकांच्या ‘तोफा’ थंडावल्या
निवडणूक झाली नसल्याचे परिणाम; पदाधिकारी, नगरसेवकांशिवाय मनपाचा कारभार
विनोद सावंत कोल्हापूर
निवडणूक झाली नसल्याने महापालिकेमध्ये प्रशासकराज अस्तित्वात आहे. पदाधिकारी, नगरसेवकांशिवाय महापालिकेचा कारभार सुरू आहे. गेल्या 65 वर्षात प्रथमच सलग तीन वर्ष महासभेला ब्रेक लागला आहे. नगरसेवकांच्या धडाडणाऱ्या तोफा थंडावल्या असून नेहमी गजबजलेला राजर्षी शाहू सभागृह शांत आहे.
कोल्हापूर नगरपालिकेची स्थापना 12 ऑक्टोंबर 1854 मध्ये झाली. 15 डिसेंबर 1972 मध्ये नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत झाले. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सध्याची महापालिकेची मुख्य इमारत आहे. ती नगरपालिका असल्यापासूनच असून या इमारतीमधून आजही कारभार सुरू आहे. नगरपालिका असताना म्हणजे 12 ऑक्टोंबर 1958 रोजी छत्रपती राजर्षी शाहू सभागृहाची उभारणी केली. तत्कालीन नगराध्यक्ष बी. बी. पाटील यांच्या हस्ते सभागृहाचे उद्घाटन झाले. आजपर्यंत नगरपालिका आणि महापालिकेच्या याच सभागृहात महासभा झाल्या आहेत. परंतु 65 वर्षात प्रथमच सलग तीन वर्ष महासभेला ब्रेक लागला असून सभागृहाचा वापर बंद झाला आहे.
महापालिकेचे 15 नोव्हेंबर 2020 रोजी सभागृहाची मुदत संपली आहे. महापालिकेची निवडणूक झाली नसल्याने तीन वर्ष नवीन सभागृह अस्तित्चात येऊ शकलेले नाही. त्यामुळेच महासभेला ब्रेक लागला आहे. सभागृहाच्या उभारणीपासून आतापर्यंत असे सलग तीन वर्ष सभागृह कधीच बंद राहिलेले नाही, हे विशेष आहे. सध्या नगर सचिव विभागाकडून सभागृहाची स्वच्छता केली जात आहे. दुरूस्तीची जबाबदारी विभागीय कार्यालय 2 शिवाजी मार्केट यांच्याकडे आहे. तीन वर्ष सभागृह वापराविना असल्याने दुरूस्तीचा विषयच नाही.
सभागृहाचा निम्म्यापेक्षा जास्त कालावधी वाया
महापालिकेची निवडणूक पाच वर्षाने होते. निवडून येणारे सदस्यांचा कालावधी पाच वर्षासाठी असतो. 15 नोव्हेंबर 2020 रोजी वास्तविक निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन नवीन सभागृह अस्तित्वात येणे अपेक्षित हेते. परंतु निवडणूक लांबली असल्याने हे शक्य झालेले नाही. तीन वर्ष झाले तरी निवडणुकीचा पत्ता नाही. 5 वर्षातील 3 वर्ष नगरसेवकांशिवायच गेले आहेत.
प्रशासनावर अंकुश राहिला नाही
तीन वर्षाच्या प्रशासक राजमध्ये नगरसेवक नाहीत म्हणून काहीच फरक पडला नसल्याचे काहींचे मत आहे. परंतु नगरसेवक असताना प्रशासनावर अंकुश राहतो. महिन्यामध्ये एकदा महासभा असते. यावेळी सदस्य प्रभागातील समस्या मांडतात. प्रशासनातील चुका सभागृहाच्या निदर्शनास आणल्या जातात. आयुक्त प्रत्येक प्रभागात जाऊन माहिती घेऊ शकत नाहीत. महासभेत त्यांना सदस्यांमार्फत शहरातील समस्यांची माहिती मिळते. सभेनंतर आयुक्त बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यास जाब विचारतात. त्यानंतर यंत्रणा कामाला लागते. तीन वर्ष नगरसेवक नाहीत, महासभाच झालेली नसल्याने प्रशासनावर अंकुश राहिलेला नाही. खराब रस्ते, कचरा उठाव, पाण्याची समस्यांना नागरीकांना समोरे जावे लागत आहे.
प्रशासक राजचेही रेकॉर्ड
महापालिकेत यापूर्वी पाचवेळा प्रशासक राज होता. यामध्ये 2 वर्ष 4 महिने द्वारकानाथ कपूर प्रशासक राहिले होते. त्यानंतर 34 वर्षात प्रथमच सलग तीन वर्ष महापालिकेत प्रशासक राज आहे. डॉ. कादंबरी बलकवडे सर्वाधिक अडीच वर्ष प्रशासक राहिल्या आहेत. प्रथमच तीन वर्ष महापौर, उपमहापौरांसह अन्य पदाधिकारी आणि नगरसेवकांशिवाय मनपाचा कारभार सुरू आहे.
कोल्हापूर नगरपालिकेची स्थापना- 12 ऑक्टोंबर 1854
छत्रपती राजर्षी शाहू सभागृहाची उभारणी-12 ऑक्टेंबर 1958
नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर- 15 डिसेंबर 1972
सध्याचे सभागृहाची मुदत संपली-15 नोव्हेंबर 2020
सभागृहाचा वापर बंद -3 वर्ष