जीडीपी वाढ 6.5 टक्क्यांपर्यंत कमी होणार : इक्रा
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
अतिवृष्टी आणि नकारात्मक कॉर्पोरेट कामगिरीमुळे जुलै-सप्टेंबर या तिमाहीमध्ये भारताची जीडीपी वाढ 6.5 टक्क्यांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे, असा अंदाज देशांतर्गत रेटिंग एजन्सी इक्राने व्यक्त केला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 (ऑक्टोबर 2024-मार्च 2025) या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत आर्थिक कामगिरीत तेजी येण्याच्या अपेक्षेमुळे संपूर्ण आर्थिक वर्षासाठी आपला वाढीचा अंदाज 7 टक्क्यांवर राखून ठेवला आहे. मागणीसह अन्य कारणांमुळे वाढ मंदावण्याची चिंता आहे. आरबीआयने चालू आर्थिक वर्ष 2024-25 साठी 7.2 टक्के आर्थिक वाढीचा अंदाज निश्चित केला आहे. जो 2023-24 मध्ये 8.2 टक्के होता.
काय म्हणाल्या अदिती नायर
अतिवृष्टी आणि कमकुवत कॉर्पोरेट कामगिरी यासारख्या कारणांमुळे दुसऱ्या तिमाहीत घसरण होईल, असे इक्राने म्हटले आहे. सरकारी खर्च आणि खरीप पेरणीतून सकारात्मक कल असला तरी औद्योगिक क्षेत्र, विशेषत: खाणकाम आणि ऊर्जा मंद होण्याची शक्यता आहे, असे रेटिंग एजन्सीच्या मुख्य अर्थतज्ञ अदिती नायर यांनी सांगितले. दुसऱ्या तिमाहीत सार्वत्रिक निवडणुकांनंतर भांडवली खर्चात झालेल्या वाढीसह प्रमुख खरीप पिकांच्या पेरणीत चांगली वाढ झाली.
वीज मागणी प्रभावीत
अतिवृष्टीमुळे बऱ्याच क्षेत्रांना प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला, ज्यामुळे खाणकाम, वीज मागणी आणि किरकोळ ग्राहक संख्या प्रभावित झाली आणि व्यापारी मालाची निर्यातही कमी झाली. जलाशयांच्या वाढीमुळे आणि पुन्हा भरल्यामुळे ग्रामीण मागणीत सुधारणा होण्याची शक्यता आहे.