For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

जीसीएचा बँक स्वाक्षरीकर्ता नसूनही २० कोटींचे व्यवहार; लेखापरीक्षणातून अनेक प्रश्न उपस्थित : बँक खाती हाताळण्यासाठी दोन पदाधिकाऱ्यांची असते आवश्यकता

10:20 AM Oct 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
जीसीएचा बँक स्वाक्षरीकर्ता नसूनही २० कोटींचे व्यवहार  लेखापरीक्षणातून अनेक प्रश्न उपस्थित   बँक खाती हाताळण्यासाठी दोन पदाधिकाऱ्यांची असते आवश्यकता
Advertisement

महेश कोनेकर
मडगाव : गोवा क्रिकेट संघटनेमध्ये बँकिंग आणि प्रशासनाशी संबंधित एक गंभीर वाद निर्माण झाला आहे. यात सुमारे २० कोटी रूपयांचे व्यवहार अशा व्यक्तीद्वारे हाताळले गेल्याचा आरोप असून, ज्यांच्याकडे अधिकृत बँक स्वाक्षरीकर्ता म्हणून कोणताही वैध अधिकार नव्हता, या प्रकरणातून हे आर्थिक व्यवहार कोणी अधिकृत केले ? बँकिंग सुरक्षा उपाय कशा प्रकारे लागू केले गेले ? आणि एचडीएफसी बँकेने ही व्यवस्था नाकारली असता, आयसीआयसीआय बँकेने ती कशी काय स्वीकारली ? हे प्रश्न ठळकपणे लेखापरीक्षणातून उपस्थित करण्यात आले आहेत.

Advertisement

हा प्रश्न केवळ स्वाक्षरीच्या बाजूला लिहिलेल्या पदापुरता मर्यादित नाही, तर तो अशा अधिकारांशी संबंधित आहे ज्यांच्या आधारे एका सार्वजनिक क्रीडा संघटनेचे मोठे आर्थिक व्यवहार हाताळले गेले. तसेच, स्वाक्षरी करण्याच्या व्यवस्थेची वैधता आणि जीसीएचा निधी सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या तपासणी यंत्रणेची परिणामकारकता यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

जीसीएच्या बँकिंग नियमांनुसार शांबा देसाई हे अधिकृत स्वाक्षरीकर्ता नव्हते. रोहन गावस देसाई यांनी १ मार्च रोजी राजीनामा दिल्यानंतर जीसीएचे सचिवपद रिक्त झाले होते. त्यानंतर १८ मार्च २०२५ रोजी, तत्कालीन उपाध्यक्ष शांबा देसाई यांच्याकडे सचिवांची दैनंदिन कामे सोपवली होती. मात्र, सचिवांची दैनंदिन कामे सोपवल्यामुळे शांबा देसाई आपोआप निवडून आलेले सचिव बनत नाहीत किंवा त्यांना जीसीएची बँक खाती हाताळण्याचा स्वतंत्र अधिकारही प्राप्त होत नाही. लोढा आयोगानुसार क्रिकेट संघटनेत दोन पदे भुषविता येत नाहीत. आता शांबा देसाई हे जीसीएचे त्यावेळी उपाध्यक्ष होते की सचिव होते, ही बाब अजुनही स्पष्ट झालेली नाही.

Advertisement

जीसीएच्या ऑडिट अहवालात, काही विशिष्ट कामे तात्पुरत्या स्वरूपात पार पाडणे आणि एखाद्या निवडून आलेल्या पदाशी संबंधित कायदेशीर व घटनात्मक अधिकार असणे, यांमधील फरकावर विशेष प्रकाश टाकला आहे. जीसीएच्या स्वतःच्या नियमांनुसार बँक खाती हाताळण्यासाठी जीसीएच्या राज्यघटनेतील नियमानुसार, बँक खाती हाताळण्यासाठी दोन निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांची आवश्यकता असते, ज्यापैकी एक खजिनदार असणे अनिवार्य आहे. तसेच अध्यक्ष, सचिव आणि खजिनदार यांपैकी कोणतेही दोन पदाधिकारी बँक खाती हाताळू शकतात.

जीसीएच्या कार्यनियमांमधील कलम १७ (अ) नुसार, देयके मंजूर करण्याच्या विहित प्रक्रियेसाठी कोषाध्यक्षांसोबत अध्यक्ष किंवा सचिव ऑडिट यांची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे. या विशिष्ट संयोजनांमध्ये उपाध्यक्षांचा समावेश नाही. त्यामुळे, अहवालात असा निष्कर्ष काढला आहे की, शांबा देसाई यांनी 'मानद सचिव' म्हणून खरेदी आदेशांवर आणि इनवॉईसवर स्वाक्षरी करणे दोन स्वतंत्र कारणांमुळे अनियमित होते. एक तर, लागू नियमांनुसार ते अधिकृत स्वाक्षरीकर्ते नव्हते आणि दुसरे म्हणजे, प्रशासकीय कार्याचे अधिकार सोपवल्यामुळे त्यांना 'सचिव' हे पद प्राप्त होत नाही.

या पार्श्वभूमीवर, ज्या व्यवहारासाठी शांबा देसाई यांनी अनधिकृतपणे स्वाक्षरी केली, अशा सुमारे २० कोटी रूपयांच्या व्यवहाराचा सविस्तर, व्यवहारनिहाय खुलासा मिळणे आवश्यक आहे. संबंधित रकमेचे प्रमाण पाहता, प्रत्येक व्यवहार कोणत्या अधिकारांतर्गत सुरू केला गेला, मंजूर केला गेला आणि पूर्ण केला गेला, याची वैधता तपासणे अनिवार्य ठरते. तसेच एचडीएफसी बँकेने ही व्यवस्था स्वीकारण्यास नकार दिला, मग सर्व ठिकाणी एकसारखे निकष का लागू केले गेले नाहीत.

एचडीएफसी बँकेने नकार दिल्याने, बँकेसमोर नेमके कोणते दस्तऐवज आणि अधिकारपत्रे सादर केली गेली होती? बँकेने हा निर्णय का घेतला व त्यानंतर इतर ठिकाणी ही व्यवस्था कोणत्या आधारावर पुढे चालू ठेवली गेली, हे तपासणे आवश्यक ठरते. आयसीआयसीआय स्वाक्षरीकर्त्यांमधील बदल स्वीकारला, मग आवश्यक अधिकृत मंजुऱ्या कुठे होत्या ? आयसीआयसीआय बँकेशी बँकेने संबंधित स्वाक्षरीकर्ते बदलण्यासाठीचा अर्ज 'मानद सचिव' या नात्याने शांबा देसाई यांची स्वाक्षरी करून सादर केला होता. अहवालात असेही म्हटले आहे की, ऑडिटर्सच्या चौकशीला उत्तर म्हणून आयसीआयसीआय बँकेने संबंधित माहिती पुरवली होती.

तक्रारदारांकडे उपलब्ध असलेल्या अतिरिक्त कागदोपत्री पुराव्यानुसार आयसीआयसीआय बँकने निवडणूक अधिकाऱ्याचे पत्र नसताना आणि व्यवस्थापन समितीची आवश्यक मंजुरी किवा ठराव नसतानाही स्वाक्षरीकर्त्यांमधील हा स्वीकारला. घोटाळ्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. आयसीआयसीआय बँकेत अधिकृत स्वाक्षरीकर्ते बदलण्याची विनंती कोणी केली ?, जेव्हा मानद सचिव पद हे रिक्त होते आणि शांबा देसाई हे बँकिंग नियमांनुसार अधिकृत स्वाक्षरीकर्ते नव्हते, तेव्हा त्यांनी कोणत्या अधिकाराखाली मानद सचिव म्हणून अर्जावर स्वाक्षरी केली ? निवडणूक अधिकाऱ्याचे पत्र सादर केले गेले होते का ? जर नसेल, तर कोणत्या आधारावर हा बदल स्वीकारला गेला ? बदलाला व्यवस्थापन समितीची मंजुरी होती का ? ठराव सादर केला गेला होता का ? असे आता अनेक प्रश्न गोवा क्रिकेट संघटनेच्या ऑडिटमुळे उपस्थित झाले आहेत.

एचडीएफसी बँकेने शांबा देसाईची स्वाक्षरी स्वीकारली नाही
ऑडिट अहवालात नमूद केल्यानुसार, एचडीएफसी बँकेने शांबा देसाई यांचा समावेश असलेली स्वाक्षरी व्यवस्था स्वीकारली नाही, ही एक अत्यंत महत्वाची बाब आहे. ही व्यवस्थात केवळ जीसीएने स्वतःहून ठरवलेली अंतर्गत पदनामाची बाब नव्हती, जी इतर सर्व संस्थांनी प्रश्न न विचारता स्वीकारली असावी, एचडीएफसी बँकेने ती स्वीकारली नाही. येथे साहजिकच प्रश्न निर्माण होतो की, जर ही व्यवस्था वैध असती आणि बँकिंग अधिकार मिळवण्यासाठी पुरेशी असती, तर एचडीएफसी बँकेने ती स्वीकारण्यास नकार का दिला? बँकेतील स्वाक्षरीकर्त्यांची व्यवस्था ही केवळ सोयीची बाब नसते. संस्थेच्या आर्थिक व्यवहारामध्ये संस्थेच्या वतीने कोण अधिकृतपणे काम करू शकतो, ती हे ठरवते.

Advertisement
Tags :

.