सहा संशयितांमध्ये आढळली जीबीएसची लक्षणे
सांगली :
राज्यात सध्या जीबीएस रुग्ण आढळून येत आहेत. पुण्यामध्ये जीबेएसचे संशयित आढळल्यानंतर आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली. सांगली जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणाही सक्षमपणे कामाला लागली. जिल्ह्यात सध्या जीबीएसचे सहा संशयित रूग्ण आढळून आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जीबीएस रूग्णांची संख्या महाराष्ट्रात अचानक आढळून आल्यावर संपूर्ण राज्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा राज्य शासनाकडून घेण्यात आला. यावेळी जिल्ह्यातही सहा रूग्ण विविध खासगी रूग्णालयात उपचार घेत असल्याचे आढळून आले. दोन रूग्ण हे ग्रामीण भागातील, दोन रूग्ण महापालिका क्षेत्रातील तर एक शहरी भागातील आणि एक रूग्ण कोल्हापूरमधील असल्याचे सांगण्यात आले. यातील एक रूग्ण हा अतिदक्षता विभागात आहे. तर पाच रूग्ण सर्वसामान्य वार्डात उपचार घेत आहेत. सहाही रूग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. विक्रमसिंह कदम यांनी सांगितले. जीबीएस या रोगाला कोणीही घाबरून जावू नये. रोगाची लक्षणे आढळून आल्यावर माहिती आरोग्य विभागाला द्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.