गाझापट्टी-जीत व जेते दोघेही हतबल
गेल्या 14 महिन्यांपासून चालू असलेल्या गाझापट्टीतील युद्धात पराजित व जेते दोघेही हतबल झाले आहेत. युद्धामुळे प्रश्न सुटत नाहीत ते बिकट होतात हे युद्ध जेव्हा टोकाला पोहोचते तेव्हा लक्षात येते आणि मग शांततेची सद्बुद्धी सुचते. हमास-इस्त्राईलमधील हा युद्धविराम म्हणजे एक नवी शांततेची नांदी असणार आहे. आखातातील इस्त्राईलने केलेला घणाघात त्यांच्या आत्मसंरक्षणाचा एक भाग होता. आता इस्त्राईलने आपली अस्मिता सिद्ध केली आहे आणि हमासला नमवले आहे.
गेल्या 14 महिन्यांपासून गाझापट्टीतील गलबला अखेर शांत होण्याच्या मार्गावर आला आहे. लढणारे आणि लढवणारे दोघेही किती काळ लढणार? शेवटी युद्धामध्ये जीत आणि जेते दोघेही हतबल होतात. तेव्हा त्यांना शांततेशिवाय दुसरा मार्ग उरत नाही. शिवाय अमेरिकेत युद्धखोर बायडेन युगाचा अस्त होऊन दणकट ट्रम्प सरकार सत्तेवर आले आहे. त्यामुळे जगाच्या कुठल्याही भागात आता युद्धाऐवजी शांततेचे पडघम वाजू लागले आहेत. त्याचीच प्रचिती इस्त्राईल आणि हमास यांच्या दरम्यान कतार येथे चालू असलेल्या द्विपक्षीय शांतता बोलणीतून येत आहे. शांततेची ही बोलणी अंतिम आणि निर्णायक टप्प्यात आहेत अशी चिन्हे दिसत आहेत. अखेर गतिरोध संपत आला आहे आणि युद्धविराम होऊन जीव मुठीत धरून दोन्ही बाजूंनी अडकून पडलेल्या ओलीसांची अखेर सुटका होईल अशी चिन्हे दिसत आहेत.
निर्णायक अंतिम टप्पा?
त्रिपक्षीय वाटाघाटी आता निर्णायक व अंतिम टप्प्यावर पोहोचल्या आहेत. त्यामुळे गुंतागुंतीचा झालेला हा तिढा सुटण्याच्या मार्गावर आहे असे राजकीय निरिक्षकांना वाटते. इस्त्राईलचे संरक्षण मंत्री कॅट्झ यांनीही हा करार आता दृष्टिपथात आला आहे व संघर्षाचा विराम होण्याची चिन्हे दिसत आहेत असे सांगून सकारात्मक मत नोंदविले आहे. अमेरिका, कतार व इजिप्तमधील बोलणी आता निर्णायक अवस्थेकडे पोहोचत आहेत. दोहा येथे चाललेल्या या शिष्टाईचे महत्त्व अनेक दृष्टीने लक्षात घेण्यासारखे आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर यापुढे इस्त्राईलला लष्करी मदतीचा सढळ हात कितपत चालू राहिल याचीही शंका आहे. शिवाय इस्त्राईलमध्ये आघाडी सरकार निवडणूक पूर्व काळात तडजोडींच्या आधारे टिकले आहे. तेथील अतिउजव्या पक्षांना अजून निर्णायक विजय मिळवावा असे वाटते तर सत्ताधारी आघाडीतील काही पक्षांना आता थांबले पाहिजे. यापुढे अधिक युद्धात भाग घेणे म्हणजे आर्थिक दिवाळखोरी ठरेल असे वाटू लागले आहे. यशाच्या टप्प्यावर असताना योग्यवेळी माघार घेणे शहाणपणाचे ठरेल. यापुढे उगाच एखादा फटका बसला तर नाक कापून अपशकुन कशाला म्हणून बेंजामिन नेतान्याहू सुद्धा आळीमीळी गुपचिळी धोरण स्विकारून शांततेची माळ जपत आहेत.
दोन्ही बाजूंनी हतबल?
इस्त्राईल आणि हमास यांच्यामधील संघर्ष 14 महिने चालला. 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने सीमा ओलांडून इस्त्राईलमध्ये अभूतपूर्व गोंधळ घातला. अत्याचाराची परिसीमा गाठली. अनेक महिलांना व मुलांना ओलीस ठेवले. त्याची जबर शिक्षा आणि चोख प्रत्युत्तर म्हणून इस्त्राईलने गाझापट्टीत खोलवर हल्ले केले. पॅलेस्टिनी लोकांना निर्वासित म्हणून पळ काढावा लागला. हमासची पळताभुई झाली आणि त्याच्या समर्थक राष्ट्रांचेही नुकसान झाले. सिरियामध्ये असद यांना रशियात पळ काढावा लागला. तिकडेही अमेरिकेची सरशी झाली. हिजबुल्लाने मागेच नांग्या टाकल्या आणि इस्त्राईलबरोबर युद्धबंदी केली. आता हमासमध्ये खोलवर घुसत असलेल्या इस्त्राईलबरोबर यापुढे दोन हात करण्यापेक्षा तूर्त युद्धबंदी करणेच शहाणपणाचे ठरेल असे हमासने मनावर घेतलेले दिसते. कतारची राजधानी दोहा येथे इस्त्राईली मुत्सद्यांचे एक शिष्टमंडळ सध्या शांततेच्या करारावर खलबते करीत आहे, तेथे तळ ठोकून आहेत. आपल्या देशाच्या हितासाठी कर्तव्याची पातळी गाठून अधिकाधिक हित कसे साध्य करता येईल हा या शिष्टमंडळाचा प्रयत्न आहे. इस्त्राईली शिष्टमंडळाचे नेते अत्यंत चतुर आणि संधी साध्य करून बुद्धिबळाच्या पटावर आपले प्यादे पुढे सरकविण्यात फार पटाईत आहेत. त्यांना हमासला चेकमेट करावयाचे आहे आणि त्यासाठी त्यांना थोडीफार उसंतही हवी आहे.
तीन टप्प्यातील योजना?
नियोजित युद्धबंदी किंवा शांतता करार हा तीन टप्प्यांनी अंमलात येणार आहे असे सध्याच्या बोलणीक्रमावरून दिसून येत आहे. पहिल्या 45 दिवसात इस्त्राईलने गाझामधील ओलीस ठेवलेले सैनिक आणि महिला यांच्या सुटकेचा प्रयत्न त्यांना अपेक्षित आहे. शहर, केंद्रे, किनारपट्टीचा भाग आणि सीमालगतची पट्टी या सर्व भागातून टप्प्याटप्प्याने इस्त्राईल आपले सैन्य मागे घेण्याची योजना आहे. गाझामधील विस्थापितांना परत उत्तरेकडे येण्यासाठी एक योजनाही आखण्यात आली आहे. या कराराच्या दुसऱ्या टप्प्यात ओलीसांची सुटका होईल आणि त्यामुळे दोन्ही बाजूंनी सामान्य नागरिक नि:श्वास टाकतील. तिसऱ्या टप्प्यात युद्ध संपण्यापूर्वी दोन्ही बाजूंनी सैन्याची माघार घेतली जाईल. अशाप्रकारे या तीन टप्प्यातून या युद्धबंदीची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. मध्यरात्री केलेल्या हल्ल्यानंतर पकडलेले 96 ओलीस गाझाच्या ताब्यात होते. त्यापैकी 62 ओलीस अद्यापही जिवंत आहेत असा इस्त्राईलचा ग्रह आहे. जे काही जिवंत ओलीस आहेत त्यांची सुटका ताबडतोब व्हावी असा इस्त्राईली जनतेचा आग्रह व दबाव आहे. त्यासाठी इस्त्राईलमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शनेही झाली. नेतान्याहू युद्ध लांबवित आहेत. त्यामुळे पकडण्यात आलेल्या ओलीसांचा जीव धोक्यात येतो. आता सरकारने युद्धाचे नाटक फार काळ चालवू नये, ओलीसांची सुटका करावी म्हणजे लोकांचा जीव भांड्यात पडेल असे लोकांना वाटते.
जाता जाता चांगले काम
अमेरिकेतील अध्यक्ष आपल्या भल्याबुऱ्या चुकांचे गाठोडे पाठीवर घेऊन सत्तेवरून पेरते होताना काही चांगल्या गोष्टी करू इच्छितात. जो बायडेन अध्यक्ष महोदयांनी सुद्धा 31 मे रोजी हमास-इस्त्राईल दरम्यान शांततेच्या तीन कलमी कराराचा आराखडा तयार केला आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी दोन्ही बाजूंनी आग्रह धरला. आपल्या या शांतता प्रस्तावावर दोन्ही बाजूंनी खलबते करून, चर्चा करून भांडणाऱ्या गटांनी एकमताने सामोपचाराने प्रश्न सोडवावा असा बायडेन महोदयांचा आग्रह होता. आपला सत्ताकाळ संपत असताना ही गोष्ट घडावी म्हणून ते पाठपुरावा करीत आहेत कारण त्यांना तेवढीच इतिहासात चांगली नोंद करावयाची आहे. हमासने अल्पकालीन युद्धविरामासाठी नकार दिल्यामुळे मागील ऑक्टोबर महिन्यातच होणारा हा करार लांबणीवर पडला होता. हमासचा आडमुठेपणा या शांतता प्रस्तावात अडसर किंवा धोंड ठरला होता. इस्त्राईलचे परराष्ट्र मंत्री कॅट्झ महोदयांनी तेथील संसदीय समितीला दिलेला सांगावाही अर्थपूर्ण आहे. त्यांनी असे सांगितले की, मागील ऑक्टोबरमधील करार थोडासा धूसर होता. आम्ही ओलीसांच्या सुटकेबाबत शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचू शकलो नव्हतो.
त्रिपक्षीय मसुद्यानुसार नोव्हेंबरमध्ये ओलीसांच्या देवाणघेवाणीबाबतच्या करारास अंतिम रुप देण्यात आले. इस्त्राईलने गाझापट्टीच्या वेस्ट बँक म्हणजे पश्चिम किनाऱ्यावर संपूर्ण विजय मिळविला आहे. परराष्ट्र मंत्र्यांनी एक्सवर दिलेल्या पोस्टमध्ये असे आत्मविश्वासाने नोंदविले आहे की, इस्त्राईलने गाझापट्टीवर संपूर्ण विजय व संपूर्ण नियंत्रण प्रस्थापित केले आहे. गाझावर संपूर्ण विजय मिळवून मगच शांतता बोलणी असा इस्त्राईलचा पवित्रा आहे. त्यामुळे इकडे कराराची बोलणी चालू असताना तिकडे इस्त्राईलने पुन्हा गाझापट्टीत खोलवर हल्ले करून 14 जणांना यमसदनास पाठविले, ही गोष्ट सुद्धा लक्षात घेण्यासारखी आहे. हमासच्या नेत्यांनी दिलेले लटके आश्वासन सूचक आहे. आम्ही 7 ऑक्टोबर पूर्वीच्या परिस्थितीमध्ये जाऊन इस्त्राईलवर कोणताही दहशतवादी हल्ला करणार नाही अशी ‘हमी’ हमासने दिली आहे, ती खरी की बेगडी(?) 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने मध्यरात्री केलेल्या दहशतवादी हल्ल्यात 1200 इस्त्राईली मारले गेले व 253 स्त्राr, पुरुष, मुलांना ओलीस ठेवण्यात आले होते. त्याचा बदला म्हणून इस्त्राईलने केलेल्या हल्ल्यात सुमारे 40,000 पॅलेस्टिनी मारले गेले. त्यांचे अनेक पुढारी इतिहासात जमा झाले. वाटाघाटी करून आणि बचाव मोहिमांच्या आधारे इस्त्राईलने 100 ओलीसांची सुटका करून घेण्यात यश मिळविले आहे. 7 डिसेंबर रोजी इस्त्राईलने 6 तासांची युद्धबंदी करून विमान व ड्रोन हल्ले थांबविले होते. त्यामध्ये त्या भागात पोलिओचे लसीकरण करणे शक्य होईल असा दृष्टिकोन होता. शिवाय ओलीसांची माहिती गोळा करण्यास हमासला मुभा देण्यात आली होती. हमासने इस्त्राईलच्या ओलीस ठेवलेल्या आजारी व वृद्ध नागरिकांची तसेच पकडण्यात आलेल्या काही अमेरिकन नागरिकांची यादीसुद्धा त्रिपक्षीय करारामध्ये सादर केली आहे आणि इस्त्राईलनेही पॅलेस्टिनी बंदिवासांची माहिती समोर ठेवली आहे. अशी माहिती कतारमधील एका अल अबी या फारसी भाषेतील वृत्तपत्राने दिली आहे. पॅलेस्टाईनची झालेली हानी अतोनात आहे. हमासच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या खात्रीपूर्वक माहितीनुसार 45,000 हून अधिक पॅलेस्टिनी नागरिक युद्धात त्यांनी गमावले आहेत. या माहितीस संयुक्त राष्ट्रसंघाने तसेच इजिप्तनेही दुजोरा दिला आहे.
प्रश्न विस्थापितांच्या पुनर्वसनाचा?
गाझामधील पॅलेस्टाईनमध्ये राहणारे 2.3 दशलक्ष लोक आहेत. त्यापैकी बरेच जण विस्थापित निर्वासित होऊन इतर देशात गेले आहेत. त्यापैकी किती लोक शांतता प्रस्थापित झाल्यानंतर आपल्या देशात परततील हा प्रश्न आहे. शिवाय विस्थापितांना अन्न, वस्त्र, निवारा, औषधपाणी, शिक्षण या सोयी मिळवून देणे, त्यांचे पुनर्वसन करणे, त्यांचे जीवन पूर्ववत सुरळीत करणे ही सुद्धा एक मोठी समस्या आहे. भारत वगळता इतर कोणत्याही देशाने या विस्थापितांना युद्ध काळातही मदत केली नाही आणि नंतरही केली नाही. भारताचा उदार दृष्टिकोन मानवी आणि सहिष्णु असून त्यांच्यासाठी भारताने औषध, अन्न, वस्त्र, निवारा इत्यादी सोयी सुविधा पूर्वीच केल्या आहेत आणि पुढेही भारत मदतीचा हात देण्यासाठी तयार आहे. गाझामधील सामान्य गरीब माणूस गांजला आहे. तो हमास व इस्त्राईल दोघांनाही वैतागला आहे. यापुढे दोघांनीही भांडणे न करता गरीबांना शांततेने जगू द्यावे अशी त्यांची इच्छा आहे.
उपासमारीने ग्रस्त झालेल्या गाझामधील लोकांचे जीवनमान सुरळीत करणे, त्यांना आरोग्य सुविधा देणे, आणि त्यांच्या मुलभूत गरजा पूर्ण करणे यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने प्राधान्यक्रमाने पुढाकार घेऊन योजना आखल्या पाहिजेत. भारतासारख्या उदार दृष्टीच्या देशाने समोर येऊन विविध विकास योजना आपतग्रस्तांसाठी हाती घेणे गरजेचे आहे.
प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर