उद्या माडखोल येथे गवळी समाजाचा जिल्हा मेळावा
महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टच्या जिल्हा शाखेच्या १८ व्या वर्धापन दिनाचे औचित्य
ओटवणे : प्रतिनिधी
महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या १८ व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त रविवारी १७ मे रोजी सकाळी १० वाजता माडखोल येथील रुद्र सभागृहात सिंधुदुर्ग जिल्हा गवळी समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या मेळाव्याला महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष अजय बिरवटकर, सरचिटणीस उदय पाटील, उपाध्यक्ष अविनाश कांबळे, खजिनदार मिलिंद दर्गे, सहचिटणीस प्रकाश गवळी आदीसह ट्रस्टचे विश्वस्त उपस्थित राहून जिल्ह्यातील गवळी समाज बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत. यानिमित्त खास महिलांसाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम होणार असुन यावेळी लहान मुली व मुलांसाठी संगीत खुर्ची खेळाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच गवळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि विविध क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी बजावलेल्या गवळी समाजातील मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. सिंधुदूर्ग जिल्हयातील गवळी समाज बांधवांनी या मेळाव्याला उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टचे सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणीचे कार्याध्यक्ष दशरथ शृंगारे, उपकार्याध्यक्ष बयाजी बुराण, सचिव नामदेव गो. गवळी, खजिनदार सिताराम केळुसकर, सहसचिव रामचंद्र भालेकर तसेच इतर सर्व सदस्य व सल्लागार यांनी केले आहे.