जर्गी सबस्टेशनला जाणाऱ्या विद्युत वाहिन्या गवशी गावाबाहेरुन नेण्याची मागणी
शाळा,अंगणवाडी व घरांजवळील कामाला ग्रामस्थांचा विरोध, आंदोलनाचा इशारा
म्हासुर्ली / वार्ताहर
धामणी खोऱ्यातून जर्गी (ता.गगनबावडा) येथील विद्युत वितरण कंपनीच्या सबस्टेशनकडे जाणाऱ्या ३३ हजार केव्ही क्षमतेच्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनी टाकण्याच्या कामाला गवशी (ता.राधानगरी) ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे.परिणामी सदर विद्युत वाहिनीमुळे ग्रामस्थां बरोबर प्राथमिक शाळा,अंगणवाडीतील विद्यार्थी व घरांचा धोका निर्माण झालेला आहे.तरी भविष्यातील धोका टाळण्यासाठी विद्युत वितरण व ठेकेदार कंपनीने उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यां गावा बाहेरून डोंगरा लगतच्या शिवारातून पुढे मार्गस्थ कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलेला आहे.
राधानगरी पन्हाळा गगनबावडा तालुक्यात विस्तारलेला धामणी खोऱ्यातील गगनबावडा तालुक्यातील धुंदवडे,जरगी, शेळोशी, बावेली, कडवे,गारीवडे तसेच राधानगरीतील चौके-मानबेट,कंदलगाव,राई, कोनोली या गावांना बारमाही विद्युत पुरवठा व्हावा यासाठी जर्गी येथे सबस्टेशन उभारण्याचे काम गतवर्षीपासून सुरू आहे.
धामणी खोऱ्यातील धुंदवडे - गारिवडे, चौके - मानबेट परिसर हा अति पावसाचा भाग असून ऐन पावसाळ्यात घरगुती तर उन्हाळ्यात शेतीच्या विद्युत पंपाचा वीज पुरवठा खंडित होत असल्याने येथील जनतेला बारा ही महिने वीजे संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.त्यामुळे या परिसरातील वीज समस्या संपुष्टात येण्यासाठी जनतेतून सबस्टेशनची मागणी होत होती.
जनतेच्या मागणीचा विचार करून शासनाने जर्गी या ठिकाणी सुमारे चार कोटी रुपये खर्चाच्या सबस्टेशनचे काम गत वर्षापासून सुरू केली असून स्पेस एन असोसिएट पॉवर इन्फ्रा प्रा.लि. इलेक्ट्रिकल इंजिनिअर अॅन्ड कॉन्ट्रॅक्टर यांच्या वतीने काम सुरु आहे.कळे - असगाव येथील सब स्टेशन मधून सुमारे ३० किलोमीटर अंतरावरील जर्गी सबस्टेशन येथे विद्युत पुरवठा करण्यासाठी संबंधित कंपनीने लोखंडी खांब व विद्युत वाहिन्या टाकण्याचे काम केले आहे.
सदर काम करताना संबंधित कंपनीने धामणी खोऱ्यातील काही गावांच्या बाहेरुन दुर वरून डोंगर भागातील शेत शिवारातून विद्युत वाहिन्या टाकण्याचे काम केले आहे.मात्र गवशी,पाटीलवाडी,पात्रेवाडी,आंबेवाडी गावांच्या हद्दीमध्ये कंपनीने ग्रामस्थांना विश्वासात न घेता मनमानी करत परखंदळे - गगनबावडा या मुख्य रस्त्यालगत वाहिनी टाकण्याचे काम केले असून सुमारे दहा ठिकाणी रस्त्यातून उच्च दाबाच्या वाहिनी आडवी (क्रॉस) गेलेली आहे. तर विद्युत वाहिन्यामुळे अनेक झाडे तोडावी लागणार असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.
गवशी गावाजवळ तर प्राथमिक शाळा, अंगणवाडी व घरे यांच्या जवळून उच्च दाबाची वाहिनी टाकण्याचे काम सुरू असताना ग्रामस्थांनी काही महिन्यापूर्वी बंद पाडले आहे. मात्र संबंधित कंपनीने ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत इतर कामे पूर्ण करण्याकडे लक्ष दिल्याने ग्रामस्थातून संताप व्यक्त होत आहे. तरी संबंधित विभाग व ठेकेदार कंपनीने ग्रामस्थांच्या मागणीचा योग्य तो विचार करून संबंधित विद्युत वाहिनी गावाच्या बाहेरुन डोंगरा लगत मार्गस्थ करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचे इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
आंदोलनाचा इशारा..!
गवशी येथून विद्युत वाहिनीचे काम करताना संबंधित कंपनीने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता खांब व वाहिनी टाकण्याचे काम केले आहे. मात्र विद्युत वाहिन्यांच्यामुळे जीवितास धोका निर्माण झालेला आहे. तरी संबंधित कंपनीने व वीज वितरण अधिकाऱ्यांनी लक्ष घालून विद्युत वाहिन्यां गावाच्या वरील बाजूने टाकाव्यात अन्यथा तीव्र आंदोलनासह उपोषण केले जाईल.
- धर्मा कांबळे, धोंडीराम केसरकर, ग्रामस्थ