For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गावरान रायवळीआंबा बाजारातून गायब, हापूस आंब्याची किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर

11:50 AM May 18, 2024 IST | Abhijeet Khandekar
गावरान रायवळीआंबा बाजारातून गायब  हापूस आंब्याची किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर
Raiwal mango
Advertisement

भुदरगड तालुक्यातील एप्रिल व मे महिन्यांमध्ये मुबलक उपलब्ध होणारा रायवळी आंबा नाहीसा होत आहे. मे संपत आला तरी या आंब्याचे दर्शन बाजारात नाही ते नाहीच. पण झाडावर देखील तो दिसेनासा झाल्याने भुदरगडचा रायवळी आंब्याचे अस्तित्वच धोक्यात आल्याची भीती निर्माण झाली आहे. त्यातच कोकण व कर्नाटकातून येणाऱ्या हापूस आंब्याचे दर जास्त असल्याने आंब्याचे दर हे सर्वसामान्यांना परवडण्यापलीकडे गेल्याने आंब्याची गोडी काहीशी कडवट झाली आहे. त्यातच यावर्षी अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानाचा फटका हापूस आंब्याला बसला आहे.

Advertisement

शेतीसोबतच आंब्याचे देखील मोठं नुकसान झाले आहे. त्यामुळे आंब्याची आवक कमी झाली असून दर प्रचंड वाढले आहेत. एप्रिल, मे हा हापूस आंब्याचा वाढता हंगाम आहे. मात्र, ऐन हंगामातच उत्पादन कमी होत असल्याने बाहेरून येणाऱ्या आंब्याचे भाव मोठ्या प्रमाणावर वधारले आहेत. त्यामुळे यंदा हापूसचे दर हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. सध्या हापूसचे दर हे 600 ते 1200 रूपयांपर्यंत आहेत. तर कर्नाटकी आंबे हे 170 ते 200 रुपये किलोने विकले जात आहेत. महागाईमुळे ग्राहकांनी पाठ फिरवल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे.

दहा वर्षांपूर्वी शेताच्या बांधावर आणि रस्त्याकडेला आंबा व फणसांची झाडे मुबलक असायची. अशावेळी आंबे उतरायचे त्यावेळी पोती भरून आंबे घरी येत. आंबे घरी आल्यानंतर शेजारी, मित्र कंपनी, पाहुणेरावळ्यांना मोकळ्या हाताने आंब्याचे वाटप होत असे. घरात कोणी मित्र, पाहुणे आल्यानंतर त्यांच्यापुढे पाटी भरून आंबे खाण्यासाठी ठेवले जात; मात्र वृक्षतोड व हवामानातील बदलामुळे कमी होत गेलेला पाऊस या भागातील गावरान आंब्याला मारक ठरला आहे. वृक्ष तोडीनंतर नवीन झाडे लावण्याबाबतची उदासीनता यामुळे आंबा, जांभळ आदी फळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

Advertisement

भुदरगडमधील सर्वच बाजारपेठांमध्ये एप्रिल व मेमध्ये चोकून खाण्यासाठी सर्वांच्या आवडीचा असणारा रायवळी (गावठी) आंबा अजूनही बाजारात आलेला नाही. तसेच गाव-वाडी वस्तीवर व रस्त्याकडेला आंब्यांनी लोंबकळत असलेली झाडे दिसत नाहीत. तसेच जांभळाची देखील झाडे कमी झाल्याने बुट्टी भरून मोठ्या गावातील चौकाचौकात जांभळे, करवंदे व तोरणे विकणारी आज्जी-मावशीही दिसेनाशा झाल्या आहेत.

निसर्गाच्या लहरीपणामुळे यावर्षी करवंदे, तोरणे, आंबा व जांभळांची उपलब्धता कमी झाली आहे. मोहर करपल्याने यावर्षी या फळांच्या उत्पनावर परिणाम झाला आहे. जांभूळ व आंबा झाडांचा इमारत बांधकाम करणे कामी सर्वात जादा उपयोग होत असल्याने या झाडांची बरेच वर्षे तोड होत असून त्या तुलनेने नवीन झाडांची लागवड होत नसल्याने या फळाच्या उपलब्धतेवर परिणाम झाला आहे.

निसर्गासाठी हानिकारक निलगिरी व ऑस्ट्रेलियन बाभूळ झाडांची लागवड खुद्द सामाजिक वनीकरण विभागाने मधल्या काळात मोठ्या प्रमाणात केली आहे. या झाडांखाली साधे गवतही उगवत नाही. पक्षी घरटे देखील बांधत नाहीत. जमिनीतील खोलवर पाणी शोषतात, त्यामुळे भूगर्भातील पाणीसाठा खोलवर जातो. अशा हानिकारक वृक्षांची लागवड करण्यापेक्षा आंबा, जांभूळ, नाना, हुंबर, फणस अशा झाडांची लागवड सरकारी यंत्रणेने करणे आवश्यक आहे. अन्यथा पुढील पिढीला रायवळी आंबा, जांभूळ आदी फळे खाण्यासाठी मिळतील काय, हा प्रश्न निर्माण होत आहे.

Advertisement
Tags :

.