गौतम खट्टर यांची चौकशी सुरु
पणजी : वास्को येथील जाहीर कार्यक्रमात संत फ्रान्सिस झेवियर यांच्याविषयी प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी गौतम खट्टर यांना गोवा सायबर क्राईम ब्रांचच्या पोलिसांनी हिमाचल प्रदेशातील कुलु जिह्यातून अटक केल्यानंतर काल, रविवारी रायबंदर येथील सायबर क्राईम पोलिसांत हजर केले. गोवा क्राईम ब्रांचचे निरीक्षक परेश नाईक, उपनिरिक्षक माधव नाईक आणि हवालदार नवीन पालयेकर यांच्या पथकाने संशयित खट्टर यांना तीन दिवसांच्या ट्रान्झिट रिमांडवर रविवारी दुपारी मोपा विमानतळावर आणले. त्यानंतर त्यांना थेट रायबंदर येथील गुन्हा शाखेत आणण्यात आले आहे.
कुल्लू, हैदराबाद आणि त्यानंतर गोवा असा प्रवास करीत रायबंदर क्राईम ब्रांचचे पोलिसांचे पथक संशयित खट्टर यांना घेऊन गोव्यात आले. गोव्यातून निघालेले गौतम खट्टर अटकेपासून बचाव करण्यासाठी हिमाचल प्रदेशातील कुलु जिह्यातील मराल येथील दुर्गम टेकडीवरील श्री नीळकंठ मंदिर परिसरातील एका घरात आश्रयाला असल्याची विश्वसनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस आपल्यापर्यंत पोहचणार याची चाहुल लागताच खट्टर यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला होता. परंतु हिमाचल पोलिसांच्या मदतीने मराल येथील चेक नाक्यावर सापळा रचून त्यांना कारसह ताब्यात घेण्यात आले होते.
खट्टर म्हणाले... ‘सत्यमेव जयते’!
रविवारी रायबंदर येथे क्राईम ब्रांच बाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. दुपारी दीडच्या सुमारास पोलिसांचे पथक रायबंदर येथे पोहोचले. यावेळी गौतम खट्टर यांनी पत्रकारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना त्वरित नेले. दुपारी अडीचच्या सुमारास गौतम खट्टर यांना वैद्यकीय तपासणीसाठी गोमेकॉत नेण्यात आले. यावेळी खट्टर यांनी दुसऱ्यांदा पत्रकारांशी संवाद शाधत ‘सत्यमेव जयते’ म्हटले.