गौतम खट्टरच्या भावाला हरिद्वारमध्ये अटक
गौतमसोबत सहआरोपी म्हणून नोंद: गौतमची विधाने केली होती व्हायरल
पणजी : गौतम खट्टर यांच्या वादग्रस्त विधानाप्रकरणी त्यांचे भाऊ माधव खट्टर यांना हरिद्वार येथे अटक करण्यात आली असून त्यांची याबाबत कसून चौकशी करण्यात आली आहे. माधव खट्टर हे वास्कोतील कार्यक्रमासाठी गौतमसोबत आले होते. गौतम खट्टरने केलेले वादग्रस्त विधान माधवनेच रेकॉर्ड केले होते आणि त्यानंतर ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित केले होते, असे पोलिस तपासात उघड झाले आहे. म्हणून त्यांना सहआरोपी करुन अटक करण्यात आली आहे. वास्कोतील आयोजकांनी तपासात सांगितले आहे की, ते गौतमच्या कार्यक्रमातील उपस्थितीसाठी आणि लॉजिस्टिक व्यवस्थेसाठी माधवशी समन्वय साधत होते. विमानाची तिकिटे, राहण्याची सोय आणि 51,000 रुपये या अटींवर माधवने गौतमच्या उपस्थितीसाठी होकार दिला होता. गौतमने केलेले भाषण माधव खट्टर यानेच तयार केले होते. माधवनेच ते रेकॉर्ड करून सोशल मीडियावर प्रसारित केले होते. त्यानुसार माधव खट्टर यांना सहआरोपी करण्यात आले आहे.
गौतम खट्टरच्या घरावर रात्रभर पाळत ठेवल्यानंतर हरिद्वारमध्ये तळ ठोकून असलेल्या गोवा पोलिसांच्या पथकाने माधव खट्टरचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यांना तिथे अटक करण्यात आली असून पुढील तपासासाठी गोव्यात आणले जात आहे. वास्को येथे परशुराम जयंतीच्या कार्यक्रमात भाषण करताना गौतम खट्टरने संत फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यामुळे आमदार, मंत्र्यांसह सर्व धर्मीय लोकांकडून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी झाली. वास्को पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. इतर पोलिसस्थानकांतही तक्रारी नोंदवण्यात आल्याने, तपासाची जबाबदारी गुन्हे शाखेकडे देण्याचे आदेश काल मंगळवारी जारी करण्यात आले. त्याला अटक करण्यासाठी पोलिसांच्या पथकाने मंगळवारी रात्री डेहराडून येथील त्याच्या घरी चौकशी केली, मात्र तो तिथे सापडला नाही.
पोलिस त्याचा शोध घेत आहेत गौतम खट्टरसाठी ‘लूक आऊट नोटिस’
क्राइम ब्रांचने मुख्य आरोपी गौतम खट्टर याच्या विरोधात ‘लूक आऊट’ नोटीसही जारी केली असून ती ब्युरो ऑफ इमिग्रेशनकडे पाठवण्यात आली आहे, जेणेकरून तो देशाबाहेर पळून जाऊ शकणार नाही. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे मुख्य आरोपी गौतम खट्टरचा शोध घेण्यासाठी क्राईम ब्रांचचे पोलिस पथक देशातील विविध प्रमुख शहरांमध्ये शोध घेत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.