गौतम खट्टर यांना अखेर सशर्त जामीन मंजूर
त. भा. प्रतिनिधी
पणजी : वास्को येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेले गौतम खट्टर यांना अखेर वास्को प्रथमवर्ग न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. खट्टर यांच्या जामीन अर्जावरील निकाल शनिवारी सकाळच्या सत्रात अपेक्षित होता, मात्र न्यायालयाने राखून ठेवला आणि दुपारी जाहीर केला. सकाळपासून न्यायालयाच्या परिसरात बरीच गर्दी झाली होती.
गौतम खट्टर यांच्यावतीने अॅड. अमय प्रभुदेसाई यांनी न्यायालयात बाजू मांडली. खट्टर यांच्या वैद्यकीय समस्येमुळे ते गोमेकॉत उपचार घेत आहेत. त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने ते न्यायालयात हजर राहू शकले नाही. त्यामुळे त्यांची प्रक्रिया व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गोमेकॉतूनच झाली.
खट्टर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्यभरात खळबळ माजली होती. त्यांनी केलेल्या विधानामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करून त्यांच्यावर गुन्हा नोंद केला होता. नंतर त्यांना अटकही करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर करताना 15 हजार ऊपयांचे दोन हमिदार, न्यायालयाच्या परवानगीशिवाय परदेशात जाण्यास मज्जाव व इतर काही अटी घातल्या आहेत. या निकालामुळे राज्यात माजलेली खळबळ काही प्रमाणात कमी झाली असली तरी तक्रारींबाबत पुढील तपास सुऊ आहे.
सत्याचा नेहमीच जय असतो : गौतम खट्टर
सत्याचा नेहमीच विजय होत असतो, आपण सत्याच्या मार्गावर चालत असल्याने आपल्याला जामीन मिळणे स्वाभाविक होते. धर्माचा विजय असो, अधर्माचा विनाश होवो, प्राणीमात्राप्रति सद्भावना असो आणि जगाचे कल्याण होवो, एवढेच मी सांगेन असे गौतम खट्टर यांनी सांगितले. जामीन मिळाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी सर्व सनातनीयांचे तसेच वकील पथकाचे आभार मानले. देशभरातील सर्व संतांनी आपले मनोबल वाढविले असल्याने त्यांचाही मी ऋणी आहे. त्यांच्या ऋणाची परतफेड करणार, असेही ते म्हणाले.
भावाचा सहभाग नाही
खट्टर यांच्या भावाच्या अटकेबद्दल विचारले असता ते म्हणाले की, माधव खट्टर यांची अटक ही बेकायदा होती. त्यांचा या प्रकरणात कोणताही सहभाग नसून तो आपला भाऊ आहे हीच त्याची चूक, सत्याच्या मार्गावर चालताना प्रत्येकाला त्रास सोसावे लागले आहेत. त्यामुळे आपल्याला काही नवीन नाही, असेही गौतम खट्टर म्हणाले